प्रतिनिधी /फोंडा
जगदीश फडके यांनी लिहिलेल्या ‘भुरग्यांच्यो विनोदी बारा भानगडी’ या कोकणी नाटिका संग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ कोकणी साहित्यिक व नाटककार पुंडलीक नाईक यांच्याहस्ते झाले. फोंडा येथील थ्रिफ्ट सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळय़ाला प्रमुख वक्ते म्हणून कोकणी साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर, खास निमंत्रित डिस्कव्हरी विनोती या जाहिरात आस्थापनाचे संतोष तारी, लेखक जगदीश फडके, रंगकर्मी नितिन कोलवेकर व जयमाला प्रकाशनच्या जयमाला फडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दुर्भाट गावात राहून जगदीश फडके यांनी नाटिका लिहिल्या व त्या रंगमंचावर सादर केल्या आहेत. येथील शारदा इंग्लीश हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात गेली 30 वर्षे ते छोटय़ा छोटय़ा नाटिका लिहून त्या विद्यार्थ्यांमार्फत सादर करतात. त्यांनी एकांकिकाही लिहिल्या आहेत. अशा छोटय़ा लेखकांचे कोकणी साहित्य पुढे नेण्यास मोठे योगदान आहे असे पुंडलीक नाईक म्हणाले. हनुमंत चोपडेकर यांनी या पुस्तकाविषयी बोलताना प्रत्येक नाटिकेमधून विनोदी शैलीत करमणूक करतानाच एक संदेशही दिलेला आहे असे नमूद केले. संतोष तारी व नितिन कोलवेकर यांचीही यावेळी भाषण झाले. जगदीश फडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुंडलीक नाईक यांच्या नाटकांमुळे आपल्याला लिहिण्याची प्रेरणा मिळाली असे सांगितले. जिज्ञासा फडके हिने पाहुण्यांचा परिचय करुन दिला, तर मनिषा कमठणकर हिने आभार मानले.









