जखमी अवस्थेत शिरले होते मानवीवस्तीत : सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यातील मौजे करजगी गावात ठिपके असणाऱया प्रजातीतील नर जातीचे एक हरिण जखमी अवस्थेत जंगलातून थेट गावातील सुधीर चंदकांत पाटील यांच्या परसात शिरले. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेतील या हरिणाचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने ते बिथरले होते. हा बातमी गावातील तरूण सामाजिक कार्यकर्ते दिपक बाबुराव पाटील, नानासाहेब पाटील यांना मिळताच धोका ओळखून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी त्या जखमी हरिणास बांधून ठेवले आणि वन अधिकाऱयांना याची खबर दिली. माहिती मिळताच वनसंरक्षक व पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावकऱयांच्या मदतीने जखमी हरिणावर उपचार करण्यात आले. यानंतर त्या जखमी हरिणाला वनविभाग कार्यालयात नेण्यात आले. करजगी गावातील ग्रामस्थांनी घेतलेले कष्ट व वनविभागाला केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक होत आहे.









