पंतच्या आक्रमक, हनुमा विहारी-अश्विनच्या जिगरबाज खेळीने सिडनी कसोटी अनिर्णीत
वृत्तसंस्था/ सिडनी
रोहित शर्माने चौथ्या दिवशी नोंदवलेल्या अर्धशतकी खेळीनंतर अखेरच्या दिवशी पुजाराचे उपयुक्त अर्धशतक (77), रिषभ पंतने झळकवलेले आक्रमक अर्धशतक (97) आणि जखमी होऊनही हनुमा विहारी व आर. अश्विन यांनी जिगरबाज खेळीचे झुंजार प्रदर्शन केल्यामुळे भारताने येथे झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. पंतच्या आक्रमक खेळाने काही वेळ विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले तर विहारी व रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 289 चेंडू (सुमारे 48 षटके) किल्ला लढवून सामना अनिर्णीत राखत भारताला एकप्रकारे नैतिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या शतकवीर स्टीव्ह स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विजयासाठी 407 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशीअखेर 2 बाद 98 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळाला रहाणे व पुजारा यांनी सुरुवात केली. रहाणे एकाही धावेची भर न घालता 4 धावांवर बाद झाल्यानंतर भारताची नाजूक स्थिती झाली होती. पण रिषभ पंत व पुजारा यांनी चौथ्या गडय़ासाठी 148 धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर आणि विहारी जखमी झाल्यानंतर तसेच नंतर येणारा रवींद जडेजाही जखमी असल्याने भारताला सामना वाचविण्यासाठी प्रयत्न करणे भाग पडले. जखमी होऊनही विहारी आणि अश्विन यांनी ऑस्ट्रेलियन माऱयाला समर्थपणे तोंड देत झुंजार फलंदाजी केली आणि सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. भारताने 131 षटकांत 5 बाद 334 धावा जमविल्या.
आता या दोन संघांतील चौथी व शेवटची कसोटी ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. अनेक जखमी खेळाडू असल्याने ‘मिनी हॉस्पिटल’ बनलेला भारतीय संघ अभिमानाने या कसोटीत उतरणार आहे. तिसऱया कसोटीत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी जो लढा दिला, तो अत्यंत कौतुकास्पद होता आणि जगभरातील अनेक जाणकारांनी त्यांच्या या अविस्मरणीय झुंजीचे कौतुक केले आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांकडून वर्णभेदी शेरेबाजीलाही सामोरे जावे लागले तसेच ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा आणि त्यांच्या क्लोजइन फील्डर्सकडून होणारी बडबड यांच्याशी विहारी व अश्विन यांनी मुकाबला केला. विहारीला धोंडशिरेची दुखापत झाल्याने त्याला धाव घेणे कठीण जात होते तर अश्विनलाही पाठदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे बरेचदा त्यांना एकेरी-दुहेरी धावा घेणे टाळावे लागले आणि जिंकण्याची संधी निर्माण झालेली असतानाही त्यांना सामना वाचविण्यासाठी प्रयत्न करावा लागला. पंतने प्रतिहल्ला करीत केलेली 118 चेंडूतील 97 धावांची खेळी अविस्मरणीय होती, यात शंकाच नाही. पण अश्विन (128 चेंडूत नाबाद 39) व विहारी (161 चेंडूत नाबाद 23) यांनी दुखापत विसरून केलेली फलंदाजीही विसरली जाणार नाही. आपण बाद झालो तर सामना गमविण्याचा धोका आहे, हे जाणून अनेक चेंडू अंगावर घेत दुखापत चिघळण्याचा धोकाही त्यांनी या खेळीत पत्करला. त्यांनी 289 चेंडूत केवळ 62 धावांची अभेद्य व ‘अमूल्य’ भागीदारी केली. अश्विनच्या बरगडय़ावर एक चेंडूही लागला, पण त्याने खेळ पुढे चालू ठेवला.
पहिल्या डावात पुजाराने अर्धशतक नोंदवताना अतिसंथ फलंदाजी केल्याने त्याच्यावर टीका झाली होती. पण या डावात त्याने नोंदवलेल्या अर्धशतकाचे कौतुकही केले जात आहे. त्याने यावेळी 205 चेंडूत 77 धावांची निर्धारी खेळी करताना 12 चौकार ठोकले आणि पंतसमवेत जवळपास दीडशतकी भागीदारी केली. पंतनेही आक्रमक फटकेबाजी करताना 118 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. लियॉनविरुद्ध रंगलेली त्याची जुगलबंदी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे. पण लियॉननेच त्याला अखेर 97 धावांवर बाद केले. नवा चेंडू येण्याआधी शतक पूर्ण करण्याच्या घाईत त्याने फिरकीविरुद्ध फटका मारला आणि कमिन्सने त्याचा झेल टिपला. त्याने पहिल्या 35 चेंडूत बचावात्मक खेळ केला होता. पण अचानक त्याने लियॉनवर हल्ला सुरू करीत एक षटकार, तीन चौकार मारून गियर बदलला. पेनने लियॉनला बाजू बदलून गोलंदाजी दिली, त्यावेळीही पंतने त्याला आणखी दोन षटकार ठोकले. त्याच्या या खेळीने पुजारालाही आत्मविश्वास आला आणि त्यानेही काही शानदार फटके लगावले. शेवटी 131 षटकानंतर खेळ थांबविण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 338, भारत प.डाव 244, ऑस्ट्रेलिया दु.डाव 6 बाद 312 डाव घोषित, भारत दु.डाव 131 षटकांत 5 बाद 334 : रोहित शर्मा 52, गिल 31, पुजारा 77 (205 चेंडूत 12 चौकार), रहाणे 4 (18 चेंडू), रिषभ पंत 97 (118 चेंडूत 12 चौकार, 3 षटकार), हनुमा विहारी नाबाद 23 (161 चेंडूत 4 चौकार), आर. अश्विन नाबाद 39 (128 चेंडूत 7 चौकार), अवांतर 11. गोलंदाजी : स्टार्क 0-66, हॅझलवुड 2-39, कमिन्स 1-72, लियॉन 2-114.
पुजाराच्या 6000 कसोटी धावा पूर्ण
चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील आणखी एक माईलस्टोन गाठला असून त्याने सोमवारी 6000 धावांचा टप्पा गाठला. लियॉनला चौकार ठोकत त्याने या माईस्टोनसह अर्धशतकही साजरे केले. आयसीसीनेही याची त्वरित दखल त्याचे अभिनंदन केले. हा टप्पा गाठणारा तो भारताचा 11 वा फलंदाज असून याआधी तेंडुलकर (15921), सोमवारी 48 वाढदिवस साजरा करणारा राहुल द्रविड (13265), सुनील गावसकर (10122), व्हीव्हीएस लक्ष्मण (8741), सेहवाग (8503), कोहली (7318), गांगुली (7212), वेंगसरकर (6868), अझहरुद्दीन (6215), गुंडाप्पा विश्वनाथ (6080) यांनी हा टप्पा पार केला आहे.
हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारताच्या जखमी खेळाडूंची यादी लांबतच चालली असून त्यात आता हनुमा विहारीचीही भर पडली आहे. त्याला धोंडशिरेची दुखापत झाली असल्याने त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱया आगामी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही तो खेळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. सोमवारी खेळ संपल्यानंतर त्याला तपासणीसाठी नेण्यात आले होते. पण त्याचा अहवाल मंगळवारी मिळणार आहे. मात्र चौथ्या कसोटीआधी तो फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. जडेजाही चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याने त्याच्या जागी शार्दुल ठाकुर किंवा टी. नटराजन यापैकी एकाला संधी मिळणार आहे.
अश्विनला बुटाची लेसही बांधता येत नव्हती : पृथ्वी
ऑफस्पिनर अश्विन व विहारी यांनी जखमी असूनही झुंजार खेळी करीत सामना वाचवण्याचा पराक्रम केला. ‘रविवारी रात्री अश्विनच्या पाठीत वेदना होत होत्या आणि सोमवारी सकाळी त्याला सरळ उभारताही येत नव्हते. वेदनेमुळे बुटाची लेस वाकून बांधणेही त्याला जमत नव्हते. अशा स्थितीतही तो खेळावयास गेला आणि जे प्रदर्शन केले त्याने मीही चकित झालेय,’ असे त्याची पत्नी पृथ्वीने नंतर उघड केले. फलंदाजी करतानाही एक चेंडू त्याच्या बरगडय़ावर आदळला होता आणि पाठदुखीचाही त्याला त्रास होत होता.
सामना अनिर्णीत राहिला असला तरी तो विजयाच्या तोडीचा होता. आम्हाला हनुमा विहारी व अश्विन यांच्याकडून आज एक स्पेशल खेळी पहावयास मिळाली. जखमी अवस्थेतही त्यांनी जी खेळी ती माझ्या शतकापेक्षाही जास्त मोलाची होती. रोहित, पुजारा, पंत यांनी शानदार प्रदर्शन केले यात शंकाच नाही. पण दडपणाखाली केलेली विहारी-अश्विनची खेळी अधिक स्पेशल होती.
-भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे
चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, आर. अश्विन यांचे महत्त्व आता सर्वांनाच समजले असणार. तिसऱया क्रमांकावर येऊन दर्जेदार गोलंदाजांना सामोरे जात धावा जमविणे सोपे नसते आणि 400 कसोटी बळी सहजासहजी कोणी मिळवू शकत नाही, हे लक्षात घ्यावे. †िजगरबाज झुंज दिल्याबद्दल संघाचे अभिनंदन! आता मालिका जिंकण्याची वेळ आली आहे.
-बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली.
विल पुकोवस्कीच्या खांद्याला दुखापत
सिडनी : तिसऱया कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर विल पुकोवस्कीच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. 86 व्या षटकावेळी सूर मारून चेंडू पकडताना त्याला ही दुखापत झाली. तो काही वेळ मैदानावर होता. पण नंतर ते षटक संपल्यानंतर तो तंबूत परतला. त्यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मागील महिन्यातही भारताविरुद्धच्या डे-नाईट सराव सामन्यात त्याच्या डोक्याला चेंडू लागल्यानंतर भोवळ आली होती. त्यामुळे त्याचे पदार्पणही लांबणीवर पडले होते. येथील पहिल्या डावात त्याने 62 धावांची खेळी केली होती. चौथी कसोटी 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे.