चांदोली प्रकल्पग्रस्तांचा वनविभागाला सवाल, बेमुदत धरणे आंदोलन 24 व्या दिवशीही सुरुच
प्रतिनिधी / कोल्हापूर
जंगलात मानवीवस्ती असताना बाहेर येणार्या प्राण्यांची संख्या व होणारे हल्ले यापेक्षा जंगलात मानवीवस्ती नसताना बाहेर येणारे प्राणी व हल्ले कितीतरी पटीने जास्त आहेत, हे आकडेवारीने सिध्द झाले आहे. याचे उत्तर वनविभागाने द्यावे, अशी मागणी चांदोली प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी निवेदनाद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याकडे केली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत धरणे आंदोलन 24 व्या दिवशीही सुरुच राहीले.
निवेदनात म्हंटले आहे की, 1995ला चांदोली अभयारण्य घोषित झाले. त्यानंतर आतील कित्येक पिढÎा जंगलात राहीलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा सपाटा सरकारने लावला. कारण जंगलामध्ये माणसं राहीली तर जंगली प्राण्यांना भिती वाटेल. त्यामुळे जंगली प्राण्यांचा भयमुक्त संचार व्हावा यासाठी जंगलातील लोकांना बाहेर काढले. याला 25 वर्षे पूर्ण झाली तरी त्यांना सरकार कायदेशीर देणी देऊ शकली नाहीत ही खेदाची बाब आहे. त्यानंतर 2004 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर झाला. त्यावेळी वनविभागाने कडक बंधने घातली.
10 किलो मीटर परिसरात बफर झोन जाहीर केला. आणि काही संहिता लावली गेली. असे असताना जंगली प्राणी जंगलात निर्भयपणे वावरण्याऐवजी मनुष्यवस्तीत येऊ लागले. याचे कारण वनविभागाला अजूनही समजलेले नाही असे आमचे ठाम मत आहे. हे प्राणी बाहेर येऊन हल्ले का करतात? याची कारणे पिढÎानपिढÎा आम्ही जंगलात राहील्याने आम्हाला समजली आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनस्थळी तज्ञ, वनविभागाचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन परिसंवाद घ्यावा. यामध्ये आम्ही प्राणी जंगला बाहेर का येतात? हे पुराव्यानिशी सिध्द करुन दाखवितो. यावेळी मारुती पाटील, डी. के. बोडके, आनंदा आमकर, शामराव पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.









