पोलीस वनविभागाची गोकाक तालुक्यात कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
जंगली प्राणी व पक्षांची तस्करी करणाऱया तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी गोकाक तालुक्मयातील कुंदरगी क्रॉस जवळ मंगळवारी ही कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून एक माकड व 14 तितर जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. एकूण पाच जणांची ही टोळी असून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. आणखी दोघे जण फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भीमाप्पा निंगाप्पा टगरी (वय 45), भीमशाप्पा सत्याप्पा बडवगोळ (वय 35), परसाप्पा सत्याप्पा नंदी (वय 21, तिघेही रा. कणसगेरी, ता. गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. यल्लाप्पा निंगाप्पा टगरी, लक्ष्मप्पा फिकीराप्पा नंदी (दोघेही रा. कणसगेरी) हे दोघे जण फरारी झाले आहेत.
पोलीस फरारी आरोपींचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांवर कलम 9, 39, 44, 51 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना गोकाक येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. रामदुर्ग येथील वनविभागाचे अधिकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









