आंबेगाव येथील प्रकार, पाचजण अटकेत
प्रतिनिधी / सावंतवाडी:
प्रशासकीय यंत्रणा संचारबंदीत व्यस्त असल्याचा फायदा घेत कुणकेरी येथील शासकीय जंगलात बेकायदेशीर प्रवेश करून आंबेगाव येथील पाचजण सागाची सात झाडे तोडत असताना त्यांना वनखात्याच्या फिरत्या पथकाने ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वी कुणकेरी येथील जंगलात शेकरू हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर आता वृक्षतोडीचे प्रकरण पुढे आले आहे. दरम्यान, वृक्षतेड करत जागीच त्यापासून फर्निचर बनविण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे वनखाते हादरले आहे.
कुणकेरी-आंबेगाव येथील जंगल भागात राजरोस वृक्षांची कत्तल होत आहे. वनखात्याची करडी नजर असतानाही वृक्षतोड सुरू आहे. सोमवारी सकाळी कुणकेरी येथील वनकर्मचारी सागर भोजने हे फिरतीवर गेले असता त्यांना जंगलात वृक्षतोडीचा आवाज आला. त्यांनी तात्काळ वनक्षेत्रपाल दिलीप पेडणेकर यांच्या कानी ही बाब घातली. त्यानंतर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक ई. दा. जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टी यांनी वृक्षतोड करणाऱया पाचजणांना पकडले. त्यात सूर्यकांत बाळा मिस्त्राr, बाबुराव पांडुरंग मिस्त्राr, यशवंत बाळा मिस्त्राr, दिगंबर सदाशिव दळवी, गुरुनाथ शंकर परब (सर्व रा. आंबेगाव) यांचा समावेश आहे. भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 1 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सागाची सात झाडे तोड करून त्यापासून लाकडी वस्तू बनवत असताना या पाचही जणांना पकडण्यात आले. जंगलात इलेक्ट्रिक हत्यारांच्या सहाय्याने वृक्षतोड करून जंगलातच लाकडी वस्तू बनविण्याच्या घटनेबाबत वनखाते हादरून गेले आहे. संशयितांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे, असे पानपट्टी यांनी स्पष्ट केले. सध्या संचारबंदी आहे. शासकीय यंत्रणा सध्या शहरी भागातच गुंतली आहे. याचा लाभ उठवत जंगलतोड सुरू होती.









