भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील सिंह पर्यटकांसाठी खुले : लहानांसाठी 10 रु तर मोठय़ांसाठी 20 रु तिकीट
प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दाखल झालेले सिंह पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने जंगलच्या राजाला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सिंह दाखल झाल्यापासून त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक वातावरणाला जुळवून घेण्यासाठी काही दिवस सिंहांना क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून सिंहांना खुले सोडण्यात येत आहे. त्यामुळे बालचमूंसह नागरिकांची पावले प्राणी संग्रहालयाकडे सरसावताना दिसत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने पर्यटक व वन्यप्राणीप्रेमींनी सिंहांचे दर्शन घेतले.
गत महिन्यात बेंगळूर येथील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमधून दोन नर व एक मादी असे तीन सिंह दाखल झाले आहेत. नुकताच त्यांची स्थानिक वातावरणात चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्राणी संग्रहालय खुले राहणार आहे. सध्या तिकिटाचा दर लहानांसाठी 10 रुपये तर मोठय़ांसाठी 20 रुपये आहे. दि. 1 एप्रिलपासून तिकीट दरात वाढ होणार आहे, अशी माहिती आरएफओ राकेश अर्जुनवाड यांनी दिली. दर मंगळवारी प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे.
लवकरच इतर वन्यप्राणी आणले जाणार म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात येत आहे. या संग्रहालयात सिंह आणि वाघांबरोबर लवकरच चित्ता, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण आणले जाणार आहेत. सध्या नियोजनबद्ध बांधणी केलेल्या आवास कोठडीत सिंह आणि वाघांना ठेवण्यात आले आहे. दिवसभर तीन सिंहांपैकी एका सिंहाला पर्यटकांसाठी बाहेर सोडण्यात येत आहे. वाघ-सिंहांबरोबर इतर वन्यप्राणी दाखल झाल्यास त्यांना पाहण्यासाठी पर्यटक, बालचमू, प्राणी मित्रांची गर्दी होणार आहे. वन्यप्राणी पाहण्यासाठी जवळ कोणतेच प्राणी संग्रहालय नसल्याने पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोव्याच्या पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे.