कोल्हापूर/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी जय गोयलच्या पोस्टरला कोल्हापूरी चपलांचा प्रसाद देत जाहीर निषेध केला.. या पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पक्षाच्या अध्यक्षानी जाहीर माफी मागावी आणि पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.
यावेळी जय भवानी जय शिवाजी, जय गोयल कोण रे पायताण मारा दोन रे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यापुढे महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, अश्विन शेळके, दादू शिंदे, सुनील खोत, दीपक गौड, अजित राडे, रमेश खाडे, किशोर घाटगे, रणजित जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा कामते, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.