माणूस जन्माला आला की त्याच्यासाठी जगाचा पहिला परिचय हा त्याच्या कुटुंबाद्वारे होतो. लहान असेपर्यंत, कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे घर, त्याचे आई वडील आणि घरातील सदस्य हेच त्याचे जग असते. ज्या कुटुंबात तो वाढतो तसेच संस्कार त्याच्यावर होत जातात आणि मोठा झाला तरी हे संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनून राहतात. साधारणतः ज्या सहवासात आपण वाढतो, त्या परिसराशी, माणसांशी आणि राहणीमानाबरोबर आपले एक वेगळेच नाते जोडलेले असते. भारतामध्ये संस्काराचा आणि संस्कृतीचा भरमसाठ साठा आहे आणि भारतातदेखील प्रत्येक राज्याची आपापली एक ओळख आहे. पुणे शहरातून आलेल्या माणसाची आणि मुंबई शहरात राहणाऱया माणसाची मातृभाषा जरी एक असली तरी केवळ त्यांच्या संस्कार आणि राहणीमानामुळे त्यांचे भिन्नत्व सहजपणे लक्षात येते. माणूस जगात कुठेही गेला तरी घरात होत असलेले संस्कार नकळत त्याच्या मनामध्ये रुजलेले असतात. कदाचित घरात राहत असताना या सर्व गोष्टींचा आपल्या मनावर होणारा प्रभाव सहजपणे लक्षात येत नाही.
कधी कधी माणसाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते की त्याला घरापासून लांब राहावे लागते. विशेषतः माणूस जेव्हा शिक्षण किंवा कामानिमित्त घर सोडून बाहेर जातो तेव्हा त्याला ह्या सगळय़ा गोष्टींची जाणीव होऊ लागते. आईने लावलेली शिस्त, वडिलांनी शिकविलेले तर्क, घरचे जेवण या सगळय़ा गोष्टी नकळत माणसाला आठवायला लागतात. मुख्यतः घरात जाणवणाऱया सुरक्षिततेची जाणीव ही माणसाला एकटे राहायला लागल्यावरच लक्षात येते.
माणूस हा कितीही स्वावलंबी झाला तरीही तो त्याच्या आसपासच्या गोष्टींवर नकळतपणे अवलंबून असतो.
‘आराम हराम आहे’ या चित्रपटामधील जगदीश खेबूडकर लिखित सुधीर फडकेंच्या आवाजातील गाणे ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ ह्या सर्व भावना अगदी चोखपणे प्रेक्षकांसमोर मांडते. त्या गाण्यातील ओळी, ‘तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया’चे महत्त्व तेव्हाच लक्षात येते जेव्हा माणूस थकून घरी येतो आणि साधा चहा करून द्यायलासुद्धा सोबत नसते. कुटुंबासोबत राहत असताना, घरी पोहोचेपर्यंत चहा नाष्टा तयार असतो. पण एकटे राहत असताना जेव्हा दमलो असतानाही सर्व कामे स्वतःच्या स्वतः करावी लागतात तेव्हा या छोटय़ा छोटय़ा गोष्टींची किंमत कळते. माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि बरेचदा त्याला सुख म्हणजे काय हे देखील लक्षात यायला लागते. सुख जर एखादा मोठा पेटारा असेल तर पैसा आणि समृद्धी या सगळय़ा गोष्टी त्यातील केवळ एक छोटासा घटक आहेत. सुखाचा पेटारा तेव्हाच भरतो जेव्हा या सुख-समृद्धीचा आस्वाद घ्यायला आपली माणसं आणि आपली संस्कृती आपल्याबरोबर असते. खरंतर असं म्हणायला हरकत नाही की माणसाची संस्कृती आणि त्याचे संस्कार हाच त्याचा खरा खजिना आहे. कारण संस्कृतीच्या जोरावर माणूस आपली स्वतंत्र ओळख या जगात घडवत असतो.
एकटे राहण्यात किंवा घरापासून दूर वेगळय़ा शहरात किंवा राज्यात राहण्यात एक वेगळे स्वातंत्र्यपण मिळते यात काही वादच नाही. माणूस सगळे निर्णय स्वतःच्या मनाप्रमाणे घेऊ शकतो. माणूस नवनवीन प्रकारच्या, संस्कृतीच्या माणसांच्या सहवासात येतो. घराबाहेर आपले एक वेगळे जग निर्माण करतो, नवीन ओळखीतून नवीन नातेदेखील निर्माण करतो. या सगळय़ात तो बरच काही नवीन शिकतही असतो. असे म्हणतात की ज्या गोष्टी जग बघितल्यावर तुम्हाला शिकायला मिळतील त्या कदाचित जगातील सर्वात श्रे÷ विद्यापीठातदेखील शिकायला मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी घराबाहेर किंवा राज्याबाहेर आपल्या माणसांपासून दूर राहून जरूर बघावे.
कदाचित घरात राहत असताना आपल्या आई वडिलांशी आपली भांडणं होत असतील, मतभेद होत असतील, पण तेच घर सोडून बाहेर राहिलं की माणसाला आई बाबांनी केलेल्या त्यागाची आणि त्यांनी दिलेल्या सुखसोयींची जाणीव होते. कित्येकदा लहान असताना कुठला हट्ट केला आणि आपल्यासाठी तो सहजपणे पूर्ण झाला असला तरी त्यामागे आपल्या आई वडिलांचे किती कष्ट दडले आहेत हे आपल्याला स्वावलंबी झाल्यावर लक्षात येते. विशेषतः एखाद्या मध्यमवर्गीय घरात जर आपले बालपण सहजपणे गेले असेल तर त्यामागे आपल्या पालकांचे कित्येक त्याग आहेत हे लक्षात येते.
कधीकाळी 500 रु. सुद्धा एक क्षुल्लक वाटणारी किंमतदेखील अचानक मौल्यवान वाटू लागते. वायफळ खर्च आता बंद होऊन तोच खर्च गरजा पूर्ण करण्यात निघून जातो. एवढंच नव्हे तर तुमचा जन्म एखाद्या शहरात झाला असला तर तुमच्या आई-वडिलांबरोबर तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांचेदेखील कौतुक वाटू लागते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी मेहनत करून शहरात आपले स्थान निर्माण केले म्हणून तुम्ही आज सगळय़ा सुखसोयींचा आस्वाद घेऊ शकता हा साक्षात्कार किती सुंदर आहे. मग बरेचदा हाही विचार मनात येऊ शकतो की एवढा त्याग करूनसुद्धा आपले कुटुंब जर आपल्यापासून लांब जाणार असेल तर या सगळय़ाला खरंच काही अर्थ आहे का? तर हो, नक्कीच आहे. आपण केलेल्या मेहनतीमुळे आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित झालेले पाहणे हे त्या सर्व त्यागाचे प्रतिफळ आहे. कुटुंबाप्रती आपली जबाबदारी जाणून जर माणूस पुढे चालत राहिला तर तो आपल्या माणसांच्या सोबतच समाजाचादेखील उद्धार करू शकतो. योग्य ते संस्कार घेऊन माणूस जेव्हा जगात पदार्पण करतो तेव्हा त्याच्याकडे जगात क्रांती घडविण्याची ताकद असते.
माणसाच्या जीवनात कुटुंबाचे महत्त्व हे खूप पूर्वीपासून सांगितले गेले आहे. आधी मानवाकडे जेव्हा घर, राहायला जागा, पैसा या सगळय़ा गोष्टीचे महत्त्व निर्माण झाले नव्हते तेव्हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तो समाजामध्ये गट निर्माण करू लागला. कारण एकमेकांच्या साहाय्याने तो स्वतःचे रक्षण करू शकत होता आणि कामे वाटून घेऊ शकत होता. पण आजच्या भौतिकवादी जगात माणसांपेक्षा वस्तूंना जास्त प्राधान्य दिले जाते. अशा वेळेला एक समाज म्हणून प्रत्येकाने आपापल्या पातळीवर आपल्या
कुटुंबाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील वृद्धाने आपल्या मुलांना समजून घेऊन त्यांना योग्य ते स्वातंत्र्य देऊन संस्कारावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच घरातील तरुणांनी आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे आणि समाजातील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. हा छोटासा बदल जग बदलायला पुरेसा आहे. शेवटी, वस्तूंची बदली तुम्हाला मिळेल पण आपल्या माणसांची नाही.
श्राव्या माधव कुलकर्णी








