उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथील घटना : अमेरिकेत सुरू होते शिक्षण : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
वृत्तसंस्था/ बुलंदशहर
अमेरिकेत शिकणाऱया उत्तरप्रदेशातील बुलंदरशहर येथील हुशार विद्यार्थिनीने छेडछाड करणाऱया युवकांमुळे स्वतःचा जीव गमावला आहे. छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. तसेच अज्ञात दुचाकीस्वारांच्या विरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला आहे.
अमेरिकेतील कोरोना संकटामुळे घरी परतलेली सुदीक्षा स्वतःच्या काकांसोबत दुचाकीने नातेवाईकांच्या घरी जात होती. परंतु वाटेत बुलेस्टस्वार काही युवकांनी तिची छेड काढण्यास प्रारंभ केला. छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात सुदीक्षा स्वतःच्या काकांच्या दुचाकीवरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद येथे जात असताना दुचाकीचा बुलेटवरील दोन युवकांनी पाठलाग केला. हे युवक स्वतःची बुलेट कधी ओव्हरटेक करून समोर आणायचे. तर कधी विद्यार्थिनीसंबंधी अश्लील टिप्पणी करत होते. याचबरोबर हे माथेफिरू स्टंट देखील करत होते. याच स्टंटदरम्यान या युवकांनी स्वतःची बुलेट अचानक थांबवल्याने सुदीक्षाच्या दुचाकीशी त्याची धडक झाली. या धडकेमुळे सुदीक्षा खाली कोसळून जखमी झाली. सुदीक्षाचा घटनास्थळीचा मृत्यू झाला आहे.
प्रत्यक्षदर्शी किंवा विद्यार्थिनीसोबत असलेल्या लोकांनी छेडछाडीच्या घटनेची तत्काळ माहिती दिली नव्हती. तर दुचाकी सुदीक्षाचा काका नव्हे तर भाऊ चालवत होता, असा दावा बुलंदशहर पोलिसांनी केला आहे.
सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेत परतणार होती. सुदीक्षाने 12 वी परीक्षेत जिल्हय़ात पहिला क्रमांक मिळविला होता. उच्चशिक्षणासाठी तिची अमेरिकेच्या एका महाविद्यालयात निवड झाली होती. तसेच एचसीएल कंपनीकडून तिला 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही मिळाली होती. अमेरिकेच्या बॉब्सन महाविद्यालयात ती शिकत होती. एक उत्तम कारकीर्द तिच्यासमोर होती, परंतु छेडछाडीच्या कृत्याने एक प्रतिभावंत देशाने गमावला आहे.
तपासानंतर कारवाई
या प्रकरणी 3 पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी दिली आहे. तर विशेष तपास पथक 3 दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करणार असल्याचे विधान पोलीस महासंचालक प्रवीण कुमार यांनी केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. सीसीटीव्ही चित्रण तपासून पूर्ण पारदर्शकतेसह तपास व्हावा, अशी मागणी आयोगाने केली आहे.









