जीएसएस महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहनिमित्त भरविलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला निसर्गप्रेमींचा वाढता प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस महाविद्यालय वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग, म्हादई संशोधन केंद्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहनिमित्त भरविलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला निसर्गप्रेमींचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जीएसएसच्या डायनिंग हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात 125 हून अधिक वन्यजीवांची चित्रे मांडण्यात आली आहेत.
वन्यजीवांचे संरक्षण व्हावे आणि समाजात जनजागृती व्हावी, याकरिता जीएसएस महाविद्यालयाच्यावतीने तीन दिवशीय वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करत आहेत. गुरुवारपर्यंत 600 हून अधिक निसर्गप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन वन्यप्राण्यांची माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनात हत्ती, हरिण, सिंह, वाघ, गवीरेडे, कोल्हा, जंगली मांजर, माकड यासह वटवाघुळ, घुबड, सुतारपक्षी, बेडूक, खेकडा, बदक, गरुड, साप यासह इतर किटकांचीदेखील छायाचित्रे मांडण्यात आली आहेत.
या प्रदर्शनात निरंजन संत, राम मल्ल्या, राहुल खानोलकर, हेमंत ओघले, श्रीराज यादव, गौरांग निलजकर, शीतल देसाई, ऋतुजा कोलते आदींनी रेखाटलेली चित्रेदेखील ठेवण्यात आली आहेत. वन्यजीवांच्या संवर्धनाबरोबरच जनजागृती व्हावी, याकरिता वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. गुरुवारपासून वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून शनिवारपर्यंत सर्वांना खुले ठेवण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. सायं. 4 ते 6 यावेळेत सादरीकरण व माहितीपट दाखविले जात आहेत. नागरिकांना थेट जंगलातील निसर्गसौंदर्य व वन्यजीवांचा आनंद लुटता यावा, याकरिता छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दरम्यान वेगवेगळय़ा प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जाती, त्यांचे रंग, त्यांचे खाद्य व त्यांचा अधिवास याबद्दलही सविस्तर माहिती दिली जात आहे.
वन्यप्राण्यांबरोबर पक्षी-किटकांची माहिती

समाजात आजदेखील वन्यप्राण्यांना त्रास दिला जातो. त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण वाढल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि जागृती व्हावी, याकरिता प्रदर्शन भरविण्यात आले आहे. वन्यप्राण्यांबरोबर पक्षी आणि इतर किटकांचीदेखील माहिती दिली जात आहे.
-प्रा. ऋतुजा कोलते
प्रदर्शनातून जैवविविधतेचे ज्ञान

कॉलेजमार्फत यंदा वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. त्यामुळे विविध वन्यप्राण्यांची माहिती मिळाली. तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेची माहिती जाणून घेता आली. विविध प्राणी, पक्षी काय खातात, कुठे राहतात आणि कसे राहतात, याविषयी सविस्तर माहिती मिळाली.
-निकिता केसरकर (विद्यार्थिनी)









