बेळगाव शहर, तालुका फोटो व्हीडिओग्राफर असोसिएशन डी. बी. पाटील यांचे मत
कणबर्गी ः
एक फोटो हा अनेक शब्दांचे कार्य करत असतो. त्यामुळे प्रत्येक छायाचित्रकार बंधूने या क्षेत्रात अभ्यास करणे आता गरजेचे बनले आहे. प्रत्येकांनी नवनवीन कलात्मक पद्धतीचा अवलंब करून व्यवसाय वृद्धीगत कसा करता येईल, याकडे जातीने लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे मत बेळगाव शहर, तालुका फोटो आणि व्हीडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी केले.
बेळगाव शहर व तालुका फोटो, व्हीडिओग्राफर असोसिएशनची बैठक नुकतीच कन्नड साहित्य भवन येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडली. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार अरुण कानुरकर, चेतन कुलकर्णी, हणमंत आंबेवाडीकर आणि अनिकेत कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे छायाचित्रण व्यवसायावर संकट ओढवले आहे. यामुळे कोणीही खचून न जाता एकमेकाला साहाय्य करून आपला व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर कसा येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर छायाचित्रकारांनी कामाबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कारण छायाचित्रकारचे जेवण योग्य वेळेत न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळेच्या नियोजनानुसार कार्यरत रहावे, असे सांगितले. याप्रसंगी सचिव संजय हिशोबकर, सचिन गोवेकर, संतोष पाटील, संदीप मुतगेकर, भरमा मोटरे यांनी आपापले विचार व्यक्त केले.
यावेळी छायाचित्रकार नितीन महाले, अमोल बिडीकर, अन्वर बेग, विनायक कोकितकर, राजू शिंदोळकर, विनायक चोडणकर, अनिल बरगे, बाळू सांगूकर, दीपक खंडावळे, दीपक वांद्रे, रमेश पाटील, नामदेव कोलेकर, चंद्रकांत कोळी, सुरेश मुरकुंबी, पवन चौगुले, जितेंद्र शहापूरकर, विनायक हावळ, अनंत पाटील, भालचंद्र गावडे आदींसह छायाचित्रकार बंधू उपस्थित होते.









