सात उमेदवारी अर्ज अवैध, निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार, बहुरंगी लढती होण्याची शक्यता अधिक
बेळगाव / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या 58 वॉर्डांच्या निवडणुकीसाठी 519 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारी अर्जांची छानणी मंगळवारी झाली. विविध ठिकाणी निवडणूक कार्यालयात उमेदवारांच्या समक्ष अर्जांची छानणी करण्यात आली. 468 अर्ज वैध तर 7 अर्ज अवैध झाले. 44 जणांनी दोन अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत असून गुरुवार दि. 26 रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सोमवारी शेवटच्या दिवशी 58 वॉर्डांसाठी 434 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शनिवारपर्यंत 76 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे एकूण 519 उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात आली. वॉर्डमधील उमेदवारांच्या समक्ष अर्जासोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली. त्याचप्रमाणे नो डय़ूज प्रमाणपत्र, सूचकांचे पत्ते व मतदार यादीतील क्रमांक, उमेदवाराचा मतदार यादीतील क्रमांक तसेच प्रतिज्ञापत्र आणि जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा छाननीवेळी करण्यात आली. यावेळी सात अर्ज अवैध ठरले असून, 468 अर्ज वैध झाले आहेत. तर काही उमेदवारांनी अर्जाच्या दोन प्रति दाखल केल्याने एक अर्ज गृहित धरण्यात आले. त्यामुळे 468 उमेदवारांना निवडणूक लढविता येणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गुरुवार दि. 26 पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळनंतर प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
यंदा प्रथमच पक्षाच्या चिन्हावर महापालिका निवडणूक होत असल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. 2013 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी 58 वॉर्डांमधून 373 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. मात्र यंदा 58 वॉर्डांसाठी 519 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने माघारीनंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहेत.
प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच ज्यांना पक्षाचा बी फॉर्म मिळाला नाही अशा नाराज उमेदवारांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच मराठी भाषिकांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले असून, काही वॉर्डांमध्ये चार ते पाच तर काही वॉर्डांमध्ये 10 ते 15 उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव तंत्राच्या राजनीतीला दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी चर्चेच्या फेरीला तसेच बैठकांना ऊत आला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कोणता उमेदवार राहणार आणि कोण मागे घेणार याबाबतच्या चर्चा शहरातील कोपरा बैठकीत सुरू आहे.
पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक होत असल्याने भाजपा, काँग्रेस (आय), जेडीएस, आम आदमी, एमआयएम अशा विविध पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
| पक्ष | उमेदवारी अर्ज |
| काँग्रेस | 49 |
| भाजपा | 58 |
| जेडीएस | 12 |
| आम आदमी पार्टी | 28 |
| प्रजाकिय पक्ष | 1 |
| एमआयएम | 6 |
| एसबीपीआय | 1 |
| अपक्ष | 364 |









