खासदार संजयकाका पाटील यांच्या सुचना, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, ठेकेदारांशी चर्चा
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे आरोग्य पंढरी मिरजेची महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात बदनामी होत आहे. ही गोष्ट सर्वांसाठीच लाजिरवाणी आहे. त्यामुळे हा रस्ता अतिशय दर्जेदार व्हावा. त्यामध्ये येणारे सर्व अडथळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन दूर करु. पण त्याकडे आता सर्वांनीच गांभीर्याने पहावे, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामकाजासंदर्भात पाहणी करुन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पेंढाकार, निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीचे ठेकेदार अरुण पाटील यांच्याशी चर्चा केली. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे सर्वत्र बदनामीला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य पंढरी मिरजेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी केले.









