राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधिष्ठीत शिक्षण मातृभाषेत दिले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मावळय़ांच्या इतिहास प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे भान राखून विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या प्रेरणेतून स्वतःची प्रगती साधावी, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 58J³ee दीक्षान्त समारंभात घोषित केलेल्या राष्ट्रपती व कुलपती सुवर्णपदके तसेच शहीद तुकाराम ओंबाळे विशेष पारितोषिक प्रदान समारंभ कुलपती कोश्यारी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रसायशास्त्र विभागाच्या ऐश्वर्या मोरे यांना राष्ट्रपती सुवर्णपदक, सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या स्वाती पाटील यांना कुलपती सुवर्णपदक, ‘शहीद तुकाराम ओंबाळे विशेष कला, साहित्य, सांस्कृतिक प्रावीण्य पारितोषिक व स्मृतिचिन्ह’ विवेकानंद महाविद्यालयाच्या मयुरेश शिखरे यांना कुलपती कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान केले.
कुलपती कोश्यारी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा योग जुळून आला आहे. कोरोना, महापुराच्या काळाम विद्यापीठाने सामाजिन जबाबदारी म्हणून भरपूर काम केले आहे. जिल्हा प्रशासनालाही सर्वोत्परी सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी दिसण्यापेक्षा आपआपल्या क्षेत्रात कष्टाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाटावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबरोबर विद्यापीठ, राज्य व देशाचेही नाव सुवर्णाक्षराने कोरले जाईल. सर्व भाषा शिका, आदरही केला पाहिजे, पण त्यात मातृभाषेचे स्थान उच्च असले पाहिजे. शिक्षकांनीही विविध भाषांचा अवलंब करून नवीन अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवावेत.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, कोरोनानंतर अधिविभाग, वसतिगृह सुरू झाली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ तयार आहे. कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रम तयार आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य करार करून कौशल्याधिष्टीत उपक्रम राबविले जात आहेत. संशोधनात जागतिक क्रमवारीत विद्यापीठाच्या शिक्षकांनी स्थान मिळवले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यात विद्यापीठ अग्रेसर आहे. क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाची विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. नंदिनी पाटील व सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यापीठाचे सर्व संवैधानिक अधिकारी, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.