प्रतिनिधी / मिरज
कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे मिरज शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी सकाळी शहरातील शिवसैनिकानी स्टेशन चौकात कर्नाटकातील गाड्यांची तोडफोड केली. येणा- जाणाऱ्या कर्नाटक वाहनांवर तुफान दगडफेक सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. स्थानिक मेडिकल दुकानावर असलेले कर्नाटक भाषेतील बोर्डही फाडण्यात आले. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. भाजप शासन असलेल्या कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मिरजेत त्याचे पडसाद उमटले. शनिवारी शिवसेनेचे मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत मेगुरे यांच्यासह पप्पू शिंदे, विजय शिंदे, प्रकाश जाधव, दिलीप नाईक, महादेव हुलवान यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी स्टेशन चौकात कर्नाटकातील वाहनांना लक्ष्य केले. कर्नाटक नंबर प्लेट असलेल्या प्रत्येक वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. बॅट आणि स्टॅम्प मारून काचाही फोडण्यात आल्या. तसेच स्थानिक मेडिकल दुकानावर असलेले कन्नड भाषेतील बोर्ड फाडण्यात आले.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि परिसरातील दुकानदारांची धावपळ उडाली. ही दगडफेक नेमकी कशामुळे सुरू आहे याबद्दल नागरिकांना माहिती नव्हती. शिवसैनिकांनी कर्नाटक भाजप शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत गाड्यांवर दगडफेक सुरू केली. दरम्यान संतप्त शिवसैनिकांकडून दगडफेक सुरू असल्याचे समजताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.