वार्ताहर/ किणये
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. बेळगाव तालुक्यातून ही या कृत्याचा निषेध करण्यात आला असून शनिवारी गावागावांमध्ये दुकाने व सर्व व्यवहार बंद ठेऊन त्या कृत्याचा निषेध तालुकावासियांनी केला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर साईफेक करून काही समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तालुक्यातील नागरिक शिवप्रेमीतून होत आहे.
हलगा गावात या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला असून गावात त्या समाजकंटकांबद्दल तीव्र निषेध रॅली काढण्यात आली व समस्थ हिंदूंचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावात असलेल्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी गाव अगदी दुमदुमून गेला होता. यावेळी भागातील शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ग्राम पंचायत अध्यक्ष गणपत मारिहाळकर, सदानंद बिळगोजी, अनिल शिंदे, विलास परीट, सागर कामनाचे, भुजंग सालगुडे आदी उपस्थित होते.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मच्छे गावात पूर्णपणे गाव बंद ठेवून याचा निषेध करण्यात आला. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील मच्छे रस्त्यालगत असलेली सर्व दुकाने तसेच गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून त्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला व संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
शनिवारी सकाळपासूनच गावातील शिवप्रेमी नागरिकांनी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली व या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर निषेधार्थ गावात रॅली काढण्यात आली. यावेळी तरुणांचा व तरुणींचा मोठय़ा संख्येने सहभाग दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्य़ामुळे संपूर्ण गाव कडकडीत बंद करण्यात आले होते. त्यामुळे नेहमी गजबजणाऱया रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. याचबरोबर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सुद्धा या कृत्याचा निषेध करण्यात आलेला आहे.









