प्रतिनिधी /बेळगाव
नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या ओल्ड पी. बी. रोडवरील छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रोडची अक्षरशः दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने लोखंडी सळय़ा बाहेर पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने येथील काम करताना कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले आहे, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
काही वर्षातच येथील सर्व्हिस रोडची ही अवस्था झाली आहे. येथील रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदाराने कमी दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शहराचा विकास करण्यासाठी कोटय़वधी रुपये निधी मंजूर होतो. मात्र कमी दर्जाचे साहित्य वापरल्याने दर दोन-तीन वर्षांनी पुन्हा रस्त्यासाठी निधी मंजूर होत असल्याने कंत्राटदाराने आपला मनमानीपणा सुरू ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील फक्त सर्व्हिस रोडवर ही स्थिती नसून उड्डाणपुलावर देखील ही परिस्थिती उद्भवली आहे. येथील सर्व्हिस रोडवरून ये जा करताना पादचाऱयांना समस्या निर्माण झाली असून पादचारी पाय अडकून पडण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.









