प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वराज्याला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर तोफेचे कारखाने उभे केले. नौदलाची मुहूर्तमेढ रोवणाऱया छत्रपती शिवरायांकडुन विज्ञाननिष्ठा शिका, असे प्रतिपादन मुंबई आयआयटीचे प्राध्यापक, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. जगताप यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधा प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील सीएफसी केंद्राच्या वतीने आयोजित विज्ञान साप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. जगताप म्हणाले, जगामध्ये युरोपात वाफेच्या इंजिनचा शोधाने औद्योगिक क्रांती झाली. हे तंत्रज्ञान विभागात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन म्हणावे लागेल. पुरातन भारतही विज्ञाननिष्ठ होता, पण वाफेच्या इंजिनचा वापर भारतातील हात कामगारांनी केला असता तर सध्याचे चित्र वेगळे असते. विज्ञान फक्त शहरापर्यंत मर्यादित राहीले तर कोणतेही शाश्वत बदल होणार नाहीत.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख करून देणे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, विज्ञानाबरोबरच इतर कौशल्य देखील विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. विविध विभागांचे संशोधक विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी विद्यापीठात येणाऱया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी संशोधनात अग्रस्थानी राहतील. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत.
यामधून कुतूहल निर्माण होते, यामधूनच नवीन संकल्पना जन्मास येतात, या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले, विद्यापीठाला भेट दिलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून नवीन संशोधक निर्माण व्हावेत, अशी आशा आहे. सीएफसी केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले. विज्ञान सप्ताहात विद्यापीठ परिक्षेत्रातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.









