मराठा समाजाच्या नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती
शिवजयंतीपूर्वी निर्णय घेण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / कणकवली:
कणकवली शहरातील सर्व्हिस रोडलगत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौपदरीकरणांतर्गत विस्थापित झाला आहे. तो दुसरीकडे बसविण्यासाठी सगळय़ा राजकीय लोकांनी आश्वासने दिली. परंतु उड्डाणपुलाचे काम आता पूर्ण होत येत असले, तरी हा पुतळा दुसरीकडे बसविण्यात आलेला नाही. हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी 26 जानेवारी रोजी कणकवली येथे सर्वपक्षीय नेत्यांना एकाच मंचावर निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाजाचे नेते एसटी सावंत, लवू वारंग, सखाराम सपकाळ, सुशिल सावंत आणि त्यांच्या सहकाऱयांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील मराठा मंडळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी शिवाजी महाराजांचा हा पुतळा दुसरीकडे बसविण्यासंदर्भात शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे तेव्हा प्रयत्न करण्यात आले. परंतु त्याला विरोध झाल्याने हा पुतळा अजूनही धूळखात उड्डाण पुलाखाली आहे, असेही सांगितले. यावेळी मराठा समाजाचे भाई परब, सुशिल सावंत, बच्चू प्रभूगावकर, अविनाश राणे, यश सावंत आदी उपस्थित होते.
शिवजयंती आली, तरी पुतळय़ाबाबत निर्णय नाही!
सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली अनेक वर्षे आहे. मात्र, तो महामार्गाच्या कामात विस्थापीत झाला आहे. पुतळा दुसरीकडे बसविण्यासाठी शिवाजी चौक मित्रमंडळाने पर्यायी जागा शोधली होती. यासाठी अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र, राजकीय लोकांनी वेगवेगळय़ा जागा सूचविल्या आणि हा पुतळा तिथल्या तिथे राहिला. पुलाचे काम पूर्ण होत आहे आणि 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. तरी पुतळय़ाबाबत अजून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे राजकीय व शिवप्रेमींनी एकत्र येऊन जागा निश्चित करण्यासाठी चालना मिळावी म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.
फक्त आश्वासने दिली!
पुतळय़ासंदर्भात मंत्री, खासदार, आमदार यांनी फक्त आश्वासने दिली. पण अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या सगळय़ा राजकीय नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुतळय़ासाठी एकत्र यावे. गेली तीन वर्षे हा संघर्ष सुरू आहे. यासाठी राजकीय लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच 26 जानेवारी रोजी या पुतळय़ासंदर्भात सगळय़ा राजकीय लोकांना एकाच मंचावर आणणार आहोत.
नागरिकांप्रमाणे पुतळय़ालाही प्रतिक्षा
छत्रपती शिवाजी महाराज हे एकाच समाजाचे राजा नव्हते, तर ते सर्व समाजाचे दैवत आहेत. ते साऱया रयतेचे राजा होते. त्यामुळे शिवाजी चौकातील पुतळा दुसरीकडे बसविण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्यामुळे महामार्गाच्या कामात विस्थापीत झालेल्या नागरिकांप्रमाणे शिवाजी महाराजांचा पुतळाही न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.









