वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ते व्हेंटीलेटरवर असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची पत्नी व कोटाच्या आमदार रेणु जोगी तसेच अन्य कुटुंबीय रुग्णालयात आले आहेत.
नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील खेमका यांनी जोगी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी येण्यास सुरुवात केली असली तरी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे पुत्र अमित जोगी बिलासपूरमध्ये असून तेही रायपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अमित यांच्याशी चर्चा केली असून राज्य सरकार सर्व मदत करेल, असे सांगितले आहे.
प्रशासकीय सेवेत असणाऱया जोगी यांनी मारवाह मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने आमदारकीची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला. 2000 साली छत्तीसगढची निर्मिती झाल्यानंतर ते मुख्यमंत्रही बनले होते. 2003 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर भाजपने त्यांचा पराभव केला. तर काँग्रेसबरोबर मतभेद झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडत 2016 साली जनता काँग्रेस छत्तीसगढ पक्षाची स्थापना केली होती.









