ऑनलाईन टीम / रायपूर :
छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील महासमुंद येथे बुधवारी रात्री उशिरा एका महिलेने आपल्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
- पतीबरोबर झाले होते भांडण
गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर 50 मीटर अंतरावर सर्व मृतदेह विखुरलेले आढळले. मरण पावलेल्या सर्व मुली 10 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे आपल्या मद्यधुंद पतीसोबत भांडण झाले होते. पतीबरोबर वाद झाल्यानंतर या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, इमलीभांठा कालव्याच्या पुलाजवळ गुरुवारी सकाळी रेल्वेच्या रुळावर लोकांनी मृतदेह विखुरलेले बघितले. त्यांनी तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेलाही याबाबत माहिती देण्यात आली असून गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बेमचा येथे राहणारी महिला उमा साहू (वय 45) हिचा पती केजराम याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी तो दारू पिऊन घरी पोहोचला, तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांच्यातले भांडण इतके वाढले की संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला आपल्या पाच मुली अन्नपूर्णा (18), यशोदा (16), भूमिका (14), कुमकुम (12) आणि तुलसी (10) यांना सोबत घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान या महिलेने तिच्या सर्व मुलींसह लिंक एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा घडली असावी. त्या महिलेचे आणि तीन मुलींचे मृतदेह थोड्या अंतरावर सापडले, तर इतर दोन मुलींचे मृतदेह ट्रॅकवर पडलेले आढळले. मृतदेहांबरोबरच त्यांच्या चप्पलही दूरवर पसरलेल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, त्यानंतर या महिलेची आणि तिच्या मुलींची ओळख पटली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.









