नवी दिल्ली / वृत्तसंस्था
छत्तीसगड राज्यात ख्रिश्चन धर्मगुरुंकडून चाललेले वनवासींचे धर्मांतर हे नक्षली हिंसाचारापेक्षाही अधिक धोकादायक आहे, असा आरोप भाजपच्या खासदार गोमती साई यांनी केला आहे. त्या छत्तीसगडमधील रायगड मतदारसंघातून लोकसभेत निवडून आल्या आहेत. वनवासी देशवासियांचे धर्मांतर हा केवळ धार्मिक प्रश्न नाही, तर तो देशाच्या सुरक्षेला धोक्यात आणणारा मुद्दा ठरु शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तर तासात छत्तीसगडमधील धर्मांतराचा प्रश्न उपस्थित केला होता. याच राज्यातील बस्तर जिल्हय़ातील हिंसाचार नियंत्रणात आणल्यासंबंधात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. रायगड मतदारसंघातील जशपूर येथे धर्मांतराची समस्या बिकट झाली आहे, हे त्यांनी त्यांच्या प्रश्नांमधून निदर्शनास आणून दिले.









