आज जन्मगावी होणार अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुत्र अमित जोगी यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी जन्मगाव गोरेला येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अजित जोगी यांच्यावर गेल्या 21 दिवसांपासून रायपूरमधील नारायणा रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हापासून जोगी कोमामध्ये होते. डॉ. सुनील खेमका आणि डॉ. पंकज उमर यांच्या नेतृत्वात तज्ञांची टीम सतत 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. हृदयाच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली. वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना शुक्रवारी तिसऱयांदा हृदयविकाराचा धक्का बसला. यापूर्वी 27 मे रोजीही त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता.
अभियांत्रिकीत सुवर्ण, आयएएसपर्यंत झेप
अजित जोगी यांचे पूर्ण नाव अजित प्रमोद कुमार जोगी असे होते. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1946 रोजी पेंद्रा, बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. बीई मेकॅनिकलमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर ते 1967-68 मध्ये रायपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता होते. नंतर ते आयएएस उत्तीर्णही झाले. 1974 ते 1986 या सुमारे 12 वर्षांच्या कालावधीत सिधी, शहडोल, रायपूर आणि इंदोर येथे जिल्हाधिकारीपदाची धुरा सांभाळली होती.
राजकारणातही तेजोमय कामगिरी
1986 मध्ये राजीव गांधी यांच्या आदेशानुसार अजित जोगी यांनी जिल्हाधिकारीपदाची सेवा सोडून राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरू केल्यानंतर 1986 ते 1998 या काळात ते राज्यसभेचे सदस्य राहिले. यादरम्यान त्यांनी वेगवेगळय़ा पदांवर काम केले. 1998 साली रायगडमधून खासदारकीची निवडणूक जिंकत त्यांनी लोकसभेतही प्रवेश केला. 2000 मध्ये छत्तीसगड राज्याच्या निर्मितीनंतर ते पहिले मुख्यमंत्री झाले. 2003 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. 2016 मध्ये त्यांनी कॉंग्रेसविरुद्ध बंडखोरी केली आणि जनता कॉंग्रेस छत्तीसगढ हा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता.
…….