राधिका सांबरेकर
घर, संसार, उद्योग-व्यवसाय सांभाळताना आपल्यासाठीचं जगणं राहूनच गेलं! प्रत्येक ‘स्त्री’ एका टप्प्यावर हा विचार करते आणि ती खडबडून जागी होते. त्याच वेळी खऱया अर्थाने जबाबदाऱयांना सावरत ती स्वतःतील ‘मी’ शोधत जीवनाचा आनंद घेते. वयाची पस्तीशी-चाळीशी गाठलेल्या त्या एकत्र आल्या. बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्या तर मंगळागौरीच्या खेळातून कलागुणांची छंदांची जोपासना करु लागल्या. सिंहगड, पुणे येथील सखी मंगळागौर गुप या महिला मंडळाची ही आदर्श ठरणारी वाटचाल. मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने आयोजित तिळगुळ समारंभात मंगळागौरीचे खेळ सादर करुन आपली ओळख बेळगांवकरांना करुन दिली.
कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या निमित्ताने ‘सखी मंगळागौर’ या मंडळाची स्थापना दहा वर्षापूर्वी करण्यात आली. बालपणी खेळलेले मंगळागौरीचे खेळ कुटुंब संसाराच्या जबाबदाऱयांतून थोडीशी मोकळीक मिळाल्याने पुन्हा एकदा खेळावेत, असे ठरवत 11 जणींचा गुप एकत्रित आला. आणि पुढे हा संघ वाढत गेला. सलग दीड तासाचा मंगळागौरीचा कार्यक्रम करताना 65 हून अधिक खेळ यामध्ये सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ग्रामीण भागाचा देखावा यानंतर 65 खेळ आणि पुढे समाजप्रबोधन म्हणून ‘स्त्री भुण हत्या विरोधी जागृती, व्यसनाधीनता, पर्यावरण रक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ’ याविषयी संदेश देण्यात आला.
बचतीच्या जोडीने छंदाला प्राधान्य
बचत गटाची स्थापन करत या सर्व मैत्रिणी एकत्रित आल्या. उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्द्sशाने स्थापन केलेला गट अनेकांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य करू लागला. गटातील प्रत्येक स्त्री छोटी मोठी उद्योजिका असून आपल्या उद्योsग व्यवसायासाठी भांडवल म्हणून बचत गटाची मदत झाली. याच वेळी कलागुणांच्या सादरीकरणासाठी कार्यक्रम करावा, असा विचार पुढे आला आणि दोन वर्षात सखी मंगळागौर स्थापन करुन छंदांची, कलागुणांची जोपासना सुरु झाली.
एक कार्यक्रम समाजासाठी
लुप्त होत चाललेल्या प्रथा तसेच संस्कृती, परंपरा यांना नव्याने उभारी देत ते वाचविण्यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. या उद्द्sशाने मंगळागौरीचे खेळ सादर करुन संस्कृती जोपासना केली जाते. याच वेळी ‘वर्षातून एक कार्यक्रम समाजासाठी’ असे म्हणत वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच समाजात कार्यरत असणाऱया संस्थांमध्ये मंगळागौरीच्या मोफत खेळाचे सादरीकरण केले जाते.
बेळगावने माहेरपण केलं…
दहा वर्षापासून मंगळागौर खेळाच्या माध्यमातून पुणे, पैठण, सासवड, शिरुर, सातारा, कराड अशा विविध भागात 100 हून अधिक कार्यक्रम झाले. यामध्ये बेळगावमधील कार्यक्रमाप्रसंगी रसिकश्रोत्यांची मिळालेली दाद कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारी ठरली. या ठिकाणी मिळालेले आदरातिथ्य जणू माहेरी आल्यासारखे वाटले. आमच्या गटातील दोन सदस्यांचे बेळगाव हे माहेर. यामुळे येथे येण्याचा योग आला. मात्र त्यासमवेत आम्ही माहेरपण अनुभवल्याचे अध्यक्षा माधुरी देशचौगुले यांनी सांगितले.
श्री सुप्त गटाच्या माध्यमातून नवरात्रीत जागर
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खास ‘श्री सुप्त’ हा गट बनवून नवरात्रीतील नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. प्रार्थना, गीते यांचे सादरीकरण केले जाते. मंडळात माधुरी देशचौगुले, आरती शिंदे, श्रावणी शिंदे, वसुधा शिंदे, संपदा कुलकर्णी, मंजुश्री इनामदार, अर्चना हरसुले, मंजिरी कुलकर्णी या सदस्या आहेत.
चारोळीतून आभार
मराठा जागृती संघाच्या तिळगुळ समारंभात कार्यक्रम सादर करण्याची संधी लाभली आणि बेळगाव पहायला मिळाले. यामुळे माहिलांकडून…
2020 हे आहे लीप वर्ष,
बेळगावमध्ये मंगळागौर खेळताना झाला आम्हा हर्ष,
मराठा जागृती निर्माण संघाचा होऊ दे उत्कर्ष..!!!
असे चारोळीतून आभार व्यक्त केले.









