तृणमूलला संयुक्त मोर्चा अन् भाजपकडून आव्हान
उत्तर कोलकातामधील प्रतिष्ठेचा ठरलेल्या ‘चौरंगी’ मतदारसंघात चुरशीची लढत दिसून येत आहे. सत्तारुढ तृणमूल काँग्रेसकडून या मतदारसंघात पुन्हा एकदा उभ्या राहिलेल्या विद्यमान आमदार नयना बंधोपाध्याय यांचा मार्ग यंदा सोपा राहिलेला नाही. लोकसभेत तृणमूलचे गटनेते आणि उत्तर कोलकाताचे खासदार सुदीप बंधोपाध्याय यांच्या पत्नी नयना यांना संयुक्त मोर्चा आणि भाजप उमेदवारांकडून तीव्र आव्हान मिळत आहे.
संयुक्त मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खजिनदार संतोष पाठक मैदानात आहेत. माजी नगरसेवक असणाऱया पाठक यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. तसेच ते हिंदीभाषिक असून या मतदारसंघात हिंदी भाषिकांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. येथील विजय-पराजय निश्चित करण्यात हिंदीभाषिक मतदारांची महत्त्वाची भूमिका आहे.
भाजपही या मतदारसंघात विजयासाठी पूर्ण जोर लावत आहे. भाजपकडून देवव्रत मैदानात उतरले आहेत. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस वारंवार परप्रांतीय संबोधित असल्याने हिंदीभाषिकांसह अन्य लोकांचे समर्थन मिळण्याची अपेक्षा भाजपला वाटत आहे. अशा स्थितीत चौरंगीमध्ये यंदा तिरंगी लढत दिसून येत आहे.
तृणमूलचा कब्जा
आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध कोलकातातील बडा बाजारचा बहुतांश भाग चौरंगी विधानसभेतच मोडतो. बंगालसह देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक येथे व्यापार-व्यवसाय करतात. या मतदारसंघात 2006 पासून तृणमूल काँग्रेसचा कब्जा राहिला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रम बक्षी यांनी 2006 मध्ये मतदारसंघात विजय मिळविला होता. 2011 मध्ये शिखा मित्रा येथील आमदार झाल्या होत्या. 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत नयना बंधोपाध्याय यांनी विजय प्राप्त केला होता. 2016 च्या निवडणुकीतच त्याच विजयी झाल्या होत्या.
भाजप-तृणमूल राजकीय द्वंद
2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कुठलाच पक्ष गांभीर्याने घेत नव्हता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपने बंगालमध्ये मोठे यश मिळवून 18 जागा जिंकल्या होत्या. याचमुळे तृणमूलला भाजपकडूनच मोठे आव्हान मिळत असल्याचे चित्र आहे.









