टोकियो : 2021 मध्ये टोकियो ऑलिंपिक होणार आहे. तत्पूर्वी जपानमधील टोकियो शहराने चार देशांच्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. सदर स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात घेतली जाणार आहे. ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी जिम्नॅस्ट्सना सराव मिळावा या हेतूने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आयोजित केली जाणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.
चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा टोकियोत 8 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार असून यामध्ये यजमान जपान, चीन, रशिया आणि अमेरिका या चार देशांचे सुमारे 32 जिम्नॅस्ट सहभागी होणार आहेत. या स्पर्धेवेळी कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
कोरोनामुळे 2020 सालातील टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.
चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी आयसोलेशन सक्ती राहणार असून सुमारे 2 ते 3 हजार पेक्षकांना परवानगी जपान शासनाकडून दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑलिंपिकसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत जिम्नॅस्टिक स्टेडियमध्ये ही चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा घेतली जाणार आहे.