वृत्तसंस्था/ मुंबई ;
मागील आठवडय़ापासून सुरु झालेला शेअर बाजारातील तेजीचा प्रवास चालू आठवडय़ात कायम ठेवण्यात अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये तेजी व घसरणीचा प्रवास राहिल्याचे दिसून आले आहे. आठवडय़ातील चौथ्या दिवशी चौफेर समभाग विक्रीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात घसरण झाली आहे.
दिवसभरातील व्यवहारानंतर दिवसअखेर सेन्सेक्स 709 अंकांनी घसरला आहे. जागतिक पातळीवरील झालेल्या वेगवान विक्रीमुळे गुंतवणूकदार गुरुवारी मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले होते. दिवसभरानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स 708.68 अंकांनी घसरुन निर्देशांक 33,538.37 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 214.15 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,902.00 अंकावर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, टाटा स्टील, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरले आहेत. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, हिरोमोटो आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने संकेत दिले आहेत की, अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याच्या संकेतामुळे जागतिक शेअर बाजारांचा कल नकारात्मकतेकडे राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेने लघू कालावधीचा दर शून्याच्या जवळपास ठेवलेला आहे. यासोबत अन्य 2022 पर्यंत या दरात कोणत्याही प्रकारची वृद्धी होणार नसल्याचेही नमूद केले आहे. कोविडचा फैलाव दिवसागणिक वाढत असल्यामुळे उद्योग जगतात चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









