सुधाकर काशीद,कोल्हापूर
सोळावं वरीस धोक्याचं असं मुलींच्या मानसिक बदलाच्या संदर्भात म्हटले जाते.पण गेल्या काही वर्षातील घटनांचा संदर्भ घेता चौदावे-पंधरावे वर्षच धोक्याचे असे म्हणायची वेळ आली आहे.आजूबाजूचे वातावरण, प्रभावआणि या वयात काय चांगलं काय वाईट हे कळायचं ही नसलेली शक्यता यामुळे मुली पळून जाण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. केवळ एक आकर्षण आणि या बाह्य आकर्षणामुळे आई-वडील व ज्येष्ठ जे कोणी सांगतील ते ऐकायचं नाही अशी काही मुलींची झालेली मानसिकता त्यामुळे हे वातावरण तयार झाले आहे. समाजाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन भिडलेले हे वातावरण घराघरात प्रवेश करणार नाही यासाठी समाजातल्या जबाबदार घटकांनी एकत्र येण्याचीच ही वेळ आहे.
अलीकडचे उदाहरण आहे एका मुलीला 18 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे कायदेशीर भाषेत मुलगी शहाणी झाली.ती 18 वर्षे दोन दिवसांनी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.18 वर्षे तीन दिवसांनी विवाह बंधनात अडकली.दुसऱ्या दिवशी जोडीने पोलीस ठाण्यात आली. तिच्या आई-वडिलांना, भावांना ही माहिती समजली. ते धावत पळत पोलीस ठाण्यात आले. तेथे साहेबांच्या खोलीत एका लाकडी बाकड्या वर मुलगी,तिचा नवरा बसले होते. घरातून कॉलेजच्या ड्रेसवर पळून गेलेली मुलगी आता साडीत होती हातावर मेहंदी,मनगटात डझनभर हिरव्यागार बांगडय़ांचा चुडा होता.पदर अर्धवट डोक्यावर असलेली मुलगी खाली मान घालून बसलेली होती. आई,वडील,भाऊ साहेबांच्या खोलीत आले.पोरीला असे जोडीने बघून बाप मटकन खालीच बसला आई रडायला लागली.भाऊ मात्र ‘दीदे घराकडे चल’असं म्हणत केविलवाण्या नजरेने बहिणीकडे बघत राहिला.मुलीने मानही वर केली नाही.पोलीस अधिकाऱयांनी विचारले मुली तू काय करणार घरी आई-वडिलांकडे जाणार की लग्नग्न झालेल्या घरी जाणार मुलीने मुलाकडे बोट दाखवत याच्याबरोबर जाणार असे सांगितले.मुलीचे शब्द ऐकून बापाने तर आपले डोके गच्च धरले.मुलीला जणू बापाशी त्याक्षणी काही देणे-घेणे नव्हते. ती उठली आणि झरझर बाहेर निघून गेली.पोलीसही तिला अडवू शकत नव्हते. कारण ती आता 18 वर्षे चार दिवसाची शहाणी मुलगी झाली होती.मग पोलीस अधिकाऱयानेच मुलीच्या आई बापाला समजावून सांगितले. पाणी प्यायला दिले. मुलीच्या रडणाऱया आई-बाबांची अवस्था होऊन पोलीस ठाणेही धीर गंभीर झाले.
मुली अठरा वर्षाच्या झाल्यानंतरचे उदाहरण.पण अलीकडे अठरा वर्षाखालच्याच काही मुली प्रेम म्हणजे काय? प्रेमाचा अर्थ काय? हे माहित नसताना पळून जात आहेत.मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही असल्या फिल्मी डायलॉगने पछाडल्या आहेत आपण काय करतोय? त्याचे आपल्या आयुष्यात आपल्या आई बापांच्या आयुष्यात काय परिणाम घडणार? याचा थोडाही गंध त्यांना नाही.पण दारावरून रोज मोटरसायकल रेस करत जाणारा,फिट पॅन्ट घालणारा,विराट कोहली,रोनाल्डो,नेमार,मेस्सी यांच्यासारखी केसाची स्टाईल करणारा,लक्ष्मीपुरीत मिळणारा पाऱ्या चा चकचकीत गॉगल घालणारा व कोठे वाजत सुरू व्हायचा अवकाश अंग हलवायला सुरु करणाऱ्या आपल्या त्या ‘यारा’पेक्षा जगात दुसरं कोणी नाही.या भावनेचाच पगडा या वयातल्या मुलींच्या वर आहे.सगळ्याच मुली यात गुंतल्या आहेत असे अजिबात नाही.पण बऱ्याच मुलींची तशी मानसिकता आहे.आणि त्या अवस्थेत त्यांचे पाऊल चुकीच्या मार्गाला पडण्याची मोठी भीती आहे.
या परिस्थितीला ती एकटी मुलगी किंवा तिचे आई-वडील जबाबदार नाहीत.सभोवतालची परिस्थितीच अशी आहे की,अल्पवयीन मुलींच्यावर प्रभाव टाकणारे घटक वाढले आहेत.संस्कारापेक्षा हा प्रभाव खूप ताकदीचा होत आहे.आसपासच्या घटना,काही उदाहरणे याचाही मुलींच्यावर प्रभाव आहे.मोबाईल वरचे सगळेच वाईट नाही.पण जे आवश्यक नाही त्याचीच मांडणी आकर्षकपणे केली जात आहे.व ते समोर आणले जात आहे.14, 15 वय म्हणजे मुलींच्या मनाची कोरी पाटी.त्या काळातच त्यांना चांगल्या वाईट यातला फरक कळेनासा झाला आहे आणि नको ते घडत आहे.अल्पवयीन मुलगी बेपत्ता.पोलिसात गुन्हा दाखल ही रोज एखादी छोटी बातमी आपण वाचतो आणि सोडून देतो.पण ज्या घरात असे घडते त्या घरातल्या आई बापांचा कंठ गळ्यापर्यंत दाटून आलेला असतो.डबडबलेल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पळून गेलेल्या आपल्या लाडक्या लेकीचा दुसर चेहरा 24 तास तरळत असतो.
18 वर्षाखालील पळून गेलेल्या कोल्हापूर जिह्यातील मुली.
2020 : 129 पळून गेल्या : 112 सापडल्या
2021 : 230 पळून गेल्या :140 सापडल्या.
2022 (ऑक्टोबरपर्यंत)
199 पळून गेल्या : 107 सापडल्या.
अल्प वयातील मुलींना आम्ही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो. पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. किंवा त्यांच्या डोक्यात जे काही भरले गेले आहे त्याच्याच प्रभावाखाली त्या असतात. अशा प्रकरणात कायदेशीर कारवाई वगैरे हा पुढचा भाग आहे. पण समाजातल्या सर्वच घटकांनी अशा प्रकरणात महत्त्वाची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण कोणत्याही क्षणी ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येईल अशी सामाजिक परिस्थिती आहे.
वैष्णवी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
Previous Articleसाखळी अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी
Next Article रिंगरोडविरोधात आज भव्य मोर्चा









