रस्त्यांवर उतरला जमाव
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात कोरोनाच्या नव्या व्हॅरियंटचे 13 रुग्ण मिळाल्यावर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांतात पूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात तेथे चौथ्यांदा लॉकडाउन लागू झाल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला असून ते विरोध दर्शविण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत.
सर्व काही पुन्हा खुले करण्यात यावे अशी लोकांची मागणी आहे. जमावाने आठवडय़ाच्या अखेरीस पुन्हा व्यापक निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. लॉकडाउनमध्ये लोकांना केवळ वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक खरेदीसाठीच घरातून बाहेर पडण्याची अनुमती आहे.
तर लंडनच्या चायनाटाउन भागात शुक्रवारी वेगळे दृश्य दिसून आले आहे. एका बसवरील जाहिरात पाहून या भागातील स्थलांतरित लसीकरण केंद्रांवर गर्दी करू लागले. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले आहे.
लंडनमध्ये लसीकरणाचा प्रचार करणाऱया एका बसवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘दस्तऐवज नसलेल्या स्थलांतरितांना कुठल्याही अपॉइंटमेंटशिवाय मोफत लस, कुठलेही ओळखपत्र किंवा एनएचएस क्रमांकाचीही गरज नसल्याचे जाहिरातीत म्हटले गेले होते. याचमुळे लसीकरण केंद्रांवर स्थलांतरितांनी मोठी गर्दी केली आहे.









