वेरे-वाघुर्मे, केरी सरपंचाचा सवाल : सुदिन ढवळीकर यांच्या विधानाचा निषेध
प्रतिनिधी /फोंडा
मडकईचे आमदार मगो नेते सुदिन ढवळीकर हे बांधकाममंत्री असताना गोव्यातील जनतेला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा करीत होते. तेच ढवळीकर आता खांडेपार नदीवर होऊ घातलेल्या जलशुद्धिकरण प्रकल्पाला विरोध करीत आहेत, हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. ढवळीकर बंधूंकडे दहा वर्षे सत्ता होती. त्यावेळी प्रियोळ मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही, असा आरोप वेरे वाघुर्मे व केरी पंचायतीच्या सरपंचानी केला आहे.
केरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुदिन ढवळीकर यांच्या या कृतीचा निषेध केला. मंत्री गोविंद गावडे यांनी केवळ आपल्या प्रियोळ मतदारसंघाचा विचार करून हा शंभर कोटींचा प्रकल्प हाती घेतलेला नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रियोळ मतदारसंघासह कुर्टी, खांडेपार, बेतोडा, तसेच कुंभारजुवा व आसपासच्या भागांतील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, असे वेरे वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर यांनी सांगितले. यावेळी केरीच्या सरपंच अनिशा गावडे, उपसरपंच प्रसन्ना नाईक व इतर पंचसदस्य उपस्थित होते. सुदिन ढवळीकर हे बांधकाममंत्री असताना या प्रकल्पाची प्रक्रिया सुरु झाली होती. हा प्रकल्प नकली होता, तर त्यांनी त्याचवेळी तो रद्द का केला नाही? शंभर कोटींचा प्रकल्प नकली असल्यास मंत्रीमंडळाकडून त्याला मान्यता कशी मिळाली, असा प्रश्न शिलकर यांनी उपस्थित केला. मंत्री गोविंद गावडे यांनी प्रियोळ मतदारसंघात पाणी व वीज पुरवठय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या आहेत. निवडणुकीवर डोळा ठेऊन प्रियोळच्या जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा ढवळीकर यांचा हा प्रयत्न आहे. भविष्यात प्रियोळ मतदारसंघात पाण्याची गरज वाढणार आहे. गांजे प्रकल्पातून पुरवठा होणारे पाणी अपुरे पडेल. त्यामुळे पुढील पन्नास वर्षांचा विचार करूनच मंत्री गावडे यांनी खांडेपार येथे या प्रकल्पाला हात घातलेला आहे. सावईवेरे व केरी पंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या दोन टाक्या माजी आमदार दीपक ढवळीकर यांच्या कार्यकाळात उभारण्यात आल्या, हा त्यांचा दावा खोटा असून त्या आमदार गोविंद गावडे यांच्या कार्यकाळातच झालेल्या आहेत, असे शिलकर म्हणाले.
टाक्या वाटून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही : अनिशा गावडे
सरपंच अनिशा गावडे म्हणाल्या, केरी गावातील नागरिकांनी मागील दहा वर्षे पाण्यासाठी प्रचंड हाल सोसले. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सणासुदिलाही पाणी कुठून आणायचे हा येथील नागरिकांपुढे प्रश्न असायचा. दीपक ढवळीकर हे दहा वर्षे आमदार होते व बांधकाम खातेही त्यांच्या घरातच होते. त्यावेळी त्यांना केरी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. लोकांना पाण्याच्या टाक्या वाटून हा प्रश्न सुटणार नाही. मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नातून सन् 2017 सालापासून केरी गावात पाणी पुरवठय़ात सुधारणा होऊ लागली आहे. पालसरे व आमाडी या दोन गावामध्येही येत्या काही काळात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.









