अनगोळ नाका येथे समस्या : तातडीने दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील दहा वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अनगोळ परिसराचा समावेश असून काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. अनगोळ नाका परिसरात गळती लागल्याने 24 तास पाणी वाहत आहे. याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला. पण निवारण झाले नसल्याने गळतीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनादेखील अडथळा निर्माण झाला आहे.
अनगोळ नाका परिसरात लागलेल्या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र घिसाडघाईने काँक्रिटीकरण करण्यात आल्याने लागलेली गळती जैसे थे राहिली असून पाणी वाया जात आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी सदर जलवाहिनीला गळती लागली होती. घाईगडबडीने गळतीची दुरुस्ती करून काँक्रिटीकरण करण्यात आले. गळतीचे निवारण व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे त्यावेळी नागरिकांनीही दुरुस्तीचे काम व्यवस्थित करावे, अशी तक्रार स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे केली होती. मात्र याची दखल स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी आणि पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी घेतली नाही. त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे.
काँक्रिटीकरण झाल्यानंतर जलवाहिनीला लागलेल्या गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे काम यशस्वी झाले नाही. गळतीद्वारे दररोज हजारो लिटर पाणी वाहत आहे. या ठिकाणी गळती निवारणासाठी रस्ता खोदण्यात आल्याने खड्डा निर्माण झाला आहे. वाहनांचे अपघात होऊ नयेत याकरिता खड्डय़ाशेजारी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. एका समस्येचे निवारण झाले नाही तोच दुसरी समस्या निर्माण झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









