550 जणांचा मृत्यू : 52,718 रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असताना गुरुवारी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात जवळपास 48 हजार नवे रुग्ण आढळले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 47 हजार 905 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 86 लाख 83 हजार 916 वर पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत 80 लाख 66 हजार 501 रुग्ण बरे झाल्यामुळे रिकव्हरी दरात बऱयापैकी सुधारणा झालेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 28 हजार 121 वर पोहोचला आहे. देशात अजूनही 4 लाख 89 हजार 294 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टक्केवारीचा विचार करता देशात सध्या 5.63 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोना बरे होण्याचे प्रमाण 92.89 वर पोहोचले आहे. तर मृत्यूदर हा 1.48 टक्के इतका आहे.
कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू
उत्तराखंडमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह जीना (वय 50) यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन झाले होते. सिंह यांना उत्तराखंड भाजपचा एक अनुभवी युवा चेहरा मानले जात होते. ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सिंह यांच्या अचानक जाण्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा झटका बसला असून, त्यांची पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.