प्रतिनिधी / वाळपई
वाळपई पोलीस स्थानकापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील चोर्ला घाटात सोमवारी दुपारी एक कंटेनर उलटून झालेल्या अपघातात ट्रकमधील एक ठार झाला तर इतर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मयताचे नाव जहारसिंग गौड (18 वर्षे) असे असून तो मूळ मध्य प्रदेशातील आहे.
केरी-सत्तरी येथील अंजुणे धरणाजवळ चोर्ला घाट रस्त्यावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात जरी सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 झालेला असला तरी वाळपई पोलिसांना या अपघाताची खबर त्या रात्री 10.55 वाजता कळाली.
जहारसिंग गौड जागीच ठार
अपघातात सापडलेला ट्रक केरी ते चोर्ला घाटाच्या दिशेने जात होता. घटनास्थळाजवळ पोहोचताच ट्रक चालकाचा ट्रकावरील ताबा गेला आणि ट्रक रस्त्याबाहेर गेला. रस्त्याबाहेर वाहन जाताच ट्रक उलटला आणि त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत मूळ मध्य प्रदेशातील व सध्या केरी येथे राहात असलेला जहारसिंग गौड हा 18 वर्षीय युवक जागीच ठार झाला.
दोघेजण गंभीर जखम
या अपघातात मूळ उत्तर प्रदेशातील व सध्या अडवई येथे राहात असलेला सुमीत कुमार वर्मा (22) आणि मूळ मध्य प्रदेशातील व सध्या केरी येथे राहात असलेला महेंद्रसिंग राजगौड (5) हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला. जखमीवर सरकारी इस्पितळात उपचार चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ट्रक निष्काळजीपणे चालवून या अपघातास आणि मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन वाळपई पोलिसांनी ट्रक चालक जगताप भगवान (34) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279, 337 आणि 304 (अ) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रक चालक हा मूळ महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील संजेरी गावातील असल्याची माहिती वाळपई पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू आहे.









