पावसाळय़ातच विद्युत ट्रान्स्फॉर्मर खराब : गावातील रस्ताही वाहून गेल्याने समस्या
वार्ताहर /कणकुंबी
तालुक्मयाच्या पश्चिम टोकाला असलेल्या चोर्ला गावातील विद्युत ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्याने गाव आठ दिवसांपासून अंधारात आहे. मुसळधार पावसामुळे गावात दोन ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे चोर्ला गावच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
गाव कर्नाटकात परंतु दररोज कामानिमित्त किंवा इतर व्यवसायाशी गोव्याशी संबंध आहे. चोर्ला गावात प्रवेश करताना रस्त्यावर असलेल्या एका लहान पुलावरील रस्ता पाण्याच्या मोठय़ा प्रवाहाने अर्धाअधिक वाहून गेला आहे. गावातील स्वयंभू रामेश्वर मंदिरकडे जाणाऱया ब्रिजवरसुद्धा महापूर आल्याने या ठिकाणीदेखील अर्धा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे गावात किंवा मंदिरकडे चारचाकी किंवा इतर वाहने घेऊन जाणे मुश्कील झाले आहे.
समस्या सोडविण्यासाठी कोणीच वाली नाही का?
गावातील विद्युत ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्याने आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. विजेअभावी सर्व व्यवहार ठप्प झाले असून फोन, टीव्ही याचबरोबर विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद असल्याने गावची समस्या सोडविण्यासाठी कोणीच वाली नाही का? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. चोर्ला गावच्या समस्येकडे वरिष्ठानी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.









