वार्ताहर/ अथणी
लॉकडाऊन काळात दारूविक्रीस बंदी असताना देखील दरुर (ता. अथणी) येथे चोरुन दारूविक्री करताना आढळल्याने अबकारी खात्याने धाड टाकून सदर दुकान सील केले.
बंदी असतानाही दरुर येथे चारपट अधिक दर लावून दारूविक्री होत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली. त्यानुसार गोकाक येथील अबकारी खात्याचे अधिकारी शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर दुकानावर धाड टाकण्यात आली. यावेळी दुकान परिसरात एकच तारांबळ उडाली. अधिकाऱयांनी सदर दुकान सील केले. इतर ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरू असलेली दारू दुकानेदेखील अशा पद्धतीने बंद करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.









