प्रतिनिधी/ बेळगाव
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱया, घरफोडय़ा केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी दोघा जणांना शनिवारी पोलीस कोठडीत घेवून त्यांची कसून चौकशी केली. आणखी दोन चोऱयांच्या चौकशीसाठी सोमवारी त्यांना पुन्हा कोठडीत घेण्यात येणार आहे.
संतोष गंगाराम वड्डर (वय 46, रा. अरभांवी, ता. गोकाक), विशाल नरसिंग शेरखाने (वय 50, रा. जवारनगर, बिजलीचौक, बीवॉर्ड, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या आठवडय़ात यमकनमर्डी पोलिसांनी या जोडगोळीला अटक करुन 18 लाख 59 हजारांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला होता. त्यांनी एकूण 12 घरफोडय़ा केल्याची कबुली दिली होती. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पंतनगर जवळील शिवबसवनगर येथेही त्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. नावलगी व त्यांच्या सहकाऱयांनी न्यायालयाची परवानगी घेवून शनिवारी या जोडगोळीला पोलीस कोठडीत घेतले व त्यांची कसून चौकशी करण्यात आली.









