पांगूळ गल्लीतील घटना : संतप्त जमावाने दिला चोप
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारी मध्यरात्री चोरीसाठी घराच्या टेरेसवर चढलेल्या एका तरुणाला रंगेहाथ पकडून संतप्त जमावाने चोप दिला आहे. पांगूळ गल्ली येथे ही घटना घडली असून त्याचा आणखी एक साथीदार फरारी झाला आहे. मध्यरात्री मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
मंगळवारी मध्यरात्री 1 पासून एक तरुण वेगवेगळय़ा घरांच्या टेरेसवर चढून संशयास्पदरित्या फिरत होता. चोरीसाठी तो पाहणी करत होता. त्याचा एक साथीदार खाली थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवत होता. काही स्थानिक तरुणांनी हा प्रकार पाहून त्यांच्यावर पाळत ठेवली.
मध्यरात्री 1 पासून 3 पर्यंत चोरीसाठी या दोघाजणांचे प्रयत्न सुरूच होते. पाळत ठेवून तरुणांनी त्यांना हटकले. तरुणांना पाहताच खाली थांबलेल्या चोरटय़ाने तेथून काढतापाय घेतला. टेरेसवर चढलेला चोरटा जमावाच्या हाती अडकला. स्थानिक तरुणांना चकवून त्यानेही पलायनाचा प्रयत्न केला.
मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला चोप दिला. मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचले. 112 क्रमांकावर संपर्क साधला असता तेथेही व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नाही, असे नागरिकांनी सांगितले.
चोरीसाठी आलेल्या तरुणाला चोप देऊन मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचा साथीदार फरारी झाला आहे. हे दोघे याच परिसरातील असल्याचे आढळून आले आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी सध्या लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळातही शहर व उपनगरांत गुन्हेगार सक्रिय झाले असून चोऱया-घरफोडय़ा वाढल्या आहेत.









