आताची किंमत झाली 8 कोटी रुपये
मुंबई / प्रतिनिधी
मुंबईत एका कुटुंबाच्या घरात 22 वर्षांपूर्वी चोरी झाली होती. चोरीनंतर काही दिवसांतच तो मुद्देमाल सापडला. पण, कायदेशीर प्रक्रियेमुळे हा मुद्देमाल 22 वर्षे पोलिस स्टेशनमध्ये अडकून होता. हे सोने चोरीला गेले तेव्हा त्याची किंमत 13 लाख रुपये होती तर आता याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये झाली आहे.
प्रसिद्ध फॅशन ब्रँड चिराग दिनचे मालक अर्जन दासवानी यांच्या घरात 1998 मध्ये चोरी झाली होती. या चोरीत एक सोन्याचे नाणे, दोन सोनेरी ब्रेसलेट तसेच 100 ग्रॅम आणि 200 मिलीग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. चोरीला गेलेल्या एकूण सोन्याच्या दागिन्यांची किंमत 13 लाख रुपये ठरवण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर आता हे सोने अर्जन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी यांना रितसर सुपूर्द करण्यात आला आहे.
8 मे 1998 मध्ये अर्जन दासवानी यांच्या कुलाबा येथील घरामध्ये ही चोरी झाली होती. चोरांनी धारदार शस्त्रांचा धाक ही चोरी केली होती. त्यांनी घरात घुसताना सिक्यॉरिटी गार्डला जखमी केले होते. काही दिवसांनंतर पोलिसांनी त्या चोरांच्या गँगमधील 3 जणांना अटक केली आणि पुढे 1999 मध्ये सर्वांना शिक्षा झाली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडे मिळालेला मुद्देमाल जप्त केला. इतर दोन आरोपी आरोपी फरार असल्याने त्यांना अटक होत नाही तोपर्यंत जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांकडे ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पण, आरोपी पकडला जात नसल्याने फिर्यादींनी आपले सोने परत मिळविण्यासाठी कोर्टात विनंती केली होती. राजू दासवानी यांनी कोर्टात ही संपत्ती आपलीच असल्याचे पुरावे कोर्टात सादर केले. सर्व कागदपत्रांची तपासणी करून राजू दासवानी यांचा दावा खरा ठरवत ही संपत्ती पोलिसांना दासवानी यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.