तिघा जणांना अटक : बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
पंपसेट चोरणाऱया त्रिकुटाला अटक करून चोरीच्या 18 पंपसेट जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सैयबअली खासीमसाब नाईकवाडी (वय 26, मूळचा रा. जनता कॉलनी, खादरवाडी, सध्या रा. पिरनवाडी), नागराज लक्ष्मण करनायक (वय 24, रा. पिरनवाडी), रुदेश मल्लाप्पा तळवार (वय 21, रा. पिरनवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटीमठ, एम. बी. कोटबागी, वाय. वाय. तळेवाड आदांचा समावेश असलेल्या पथकाने पिरनवाडीजवळील तारानगर क्रॉसनजीक या त्रिकुटाला अटक केली आहे.
28 मार्च 2022 रोजी मच्छे परिसरातील शेतवडीतून पंपसेट चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याच दिवशी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. त्रिकुटाला अटक करून त्यांच्याजवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे 18 पंपसेट जप्त करण्यात आले आहेत.









