सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील जुना मोटार स्टँड परिसरात चोरीच्या मोटारसायकलसह मोबाईल, दागिने असा ऐवज जवळ बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाडळी, ता. सातारा येथील दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 75 हजार 900 रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गितेश दत्तात्रय नावडकर (वय 24) व तुषर अनिल शेलार, (वय 23, दोघे रा. पाडळी, ता. सातारा) हे दि. 15 रोजी सायंकाळी संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांच्याकडे 25 हजार रुपयांची मोटार सायकल, 15 हजारांचे पिवळय़ा धातुचे मणी, 15 हजारांची बोरमाळ, 20 हजारांचे दोन मोबाईल, रेनकोट, सॅक आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे या साहित्याबाबत विचारणा केल्यावर ते समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चोरीची मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक कुंभार करत आहेत.









