प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील चोरवणे – जखमेचीवाडी येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणीटंचाई लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत अखेर संपुष्टात आली आहे. या वाडीसाठी राबवण्यात आलेल्या पाणी प्रकल्पाचे लोकार्पणही करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती कायमचीच थांबली आहे.
चोरवणे – जखमेचीवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास ६० कि.मी. व चिपळूणपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. सातारा व रत्नागिरी सीमेवर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावची लोकसंख्या दीडशेहून अधिक असून ४५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वर्षानुवर्षे वणवणच करावी लागत होती. विशेषत: उन्हाळ्यात पायपीट करून जेमतेम मिळणाऱ्या पाण्यावर तहान भागवण्याची नामुष्की सातत्याने ओढवत होती.
घरडा कंपनीने सामाजिक उपक्रमांतर्गत १ लाख रूपयांचा निधी खर्च करत १० हजार लिटर क्षमतेची साठवण टाकी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या साठवण टाकीमुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईच्या विळख्यातून सुटका झाली आहे. या साठवण टाकीच्या लोकार्पण प्रसंगी घरडा कंपनीचे अधिकारी, सरपंच संचिता मिस्त्री, बबन मोरे विशाल मोरे आदी उपस्थित होते.