पोलिसांनी केली जप्त दुचाकी, चोरट्याने बनविगिरी करुन ठोकली धूम, इचलकरंजीतील प्रकार
प्रतिनिधी / इचलकरंजी :
ना वाहन चालविण्याचा परवाना, ना दुचाकीला नंबर प्लेट, या कारणावरुन पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली. दुचाकीस्वाराचे नाव गाव मोबाईल नंबर घेत दंडात्मक रक्कम आणि दुचाकीची कागदपत्रे घेवून येण्याबाबत सांगून त्याला सोडले अनेक दिवसाचा कालावधी लोटला तरी संबंधीत दुचाकीस्वाराने दुचाकी घेवून जाण्यासाठी आलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीस्वाराने दिलेल्या नाव गाव मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता ते सर्व बनावट असल्याचे उघडकीस आले. मग पोलिसांनी गाडीच्या इंजिन व चेस नंबरवरुन दुचाकी मालकाचा शोध घेतला पण संबंधीत दुचाकीच्या मालकाने माझी गाडी सहा महिन्यापूर्वी चोरीला गेली असून, त्यांची पंढरपूर पोलिसात नोंद केल्याची माहिती सांगताच चोरट्याने आपल्याला कसे मामा बनविले यांची इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्यात एकच चर्चा केली जात आहे.
इचलकरंजी शहरामध्ये वाहन चोरी आपि चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे घडू लागले आहेत. यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखेला शहरात फिरत असलेल्या विना नंबरप्लेट वाहने ताब्यात घ्या. त्या वाहनाच्या मालकाची व वाहनाच्या कागदपत्राची पडताळणी करुन घेण्याबाबतची मोहिम हाती घ्या, असा आदेश दिला. त्यानुसार शहरात ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत अशी मोहिम शहर वाहतूक नियंत्रण शाखेने इचलकरंजीत राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दुचाकीला नंबर प्लेट नाही, वाहन चालविण्याचा परवाना नाही. या कारणावरुन एक दुचाकी ताब्यात घेतली.
यावेळी संबंधित दुचाकी स्वाराने नाव गाव व मोबाईल नंबर पोलिसांना देवून गाडीची कागदपत्रे घेवून येतो, असे सांगून निघून गेला पण तो काही दिवसाचा कालावधी लोटला तरीदेखील परत आलाच नाही त्यामळे पोलिसांनी ताब्यातील दुचाकीच्या चेसिस व इंजिन नंबरवरुन चौकशी केली असता या गाडीचा मालक पंढरपूर (जि. सोलापूर) येथील असल्याचे आढळून आले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्याने आपली दुचाकी सहा महिन्यापूर्वीच पंढरपूर येथून चोरीस गेली आहे. याबाबत पंढरपूर पोलिसात गाडी चोरीस गेल्याची तक्रार दाखल केल्याचे सांगितले त्यानंतर शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पंढरपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चौकशी केली असता संबंधीत दुचाकी चोरीस गेल्याचे वास्तव समोर आले.