वाढत्या चोऱ्यांच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण
प्रतिनिधी / उचगांव
महिन्याभरात गांधीनगर पोलिस ठाणे हद्दीत चार पाच मोठ्या चोऱ्या तसेच मोबाईल चोरी, भुरट्या चोऱ्यांच्या वाढत्या घटनेमुळे चोरट्यांनी गांधीनगर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. चारही चोरीचा,चोरट्यांचा मागमूसही काढण्यात पोलिसांना अपयश आल्याने गांधीनगर पोलिस नेमके करतात तरी काय असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
सरनोबतवाडी (ता.करवीर) येथे विनायक खेडकर यांच्या घरातून सोन्याचे दागिने व पंधरा हजार असा सत्तर हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पुणे बेंगलोर महामार्गालगत पार्वती पार्क येथे ऐन दिवाळी सणातच अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बंद असलेल्या दोन बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ३ लाख २६ हजार रुपयांची चोरी केली.
पद्मनाभ अनंतराव पंडितराव (वय६५) सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल असुन त्यांच्या पार्वती पार्क बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम १लाख ५२ हजार असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांची चोरी झाली. तर पार्वती पार्क मध्येच वैभव फोंडेकर यांच्या बंद बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून रोख चौतीस हजार व एक तोळ्याचे सोन्याचे दागिने असा एकुण ७४ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
तर याच कॉलनीत रमजान दिलावर बारगीरही राहतात. ते कुटुंबासह तासगांवला गेले होते. येथेही चोरीचा प्रयत्न झाला. हा चोरट्यांचा कारनामा एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. गडमुडशिंगी येथील जमाल मुल्ला यांच्या घरातून साडेआठ लाखांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दिवाळी सणाच्या या गर्दीत अनेकांचे मोबाईल चोरी झाले. सर्व चोऱ्यांचा छडा लावण्यात गांधीनगर पोलिसांना अपयश आलेले आहे. सध्या पोलिसांनी गस्त वाढविली असली तरी चोरट्यांचा बंदोबस्त त्वरीत करावा अशी मागणी जनतेतून आहे.









