लडाख संघर्षावर पंतप्रधान मोदींची सूचक प्रतिक्रिया, चिथावल्यास धडा शिकविण्याचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख येथे झालेल्या संघर्षात चीनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत असताना भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. आम्हाला सीमेवर शांतता हवी आहे. मात्र कोणी चिथावणीखोर कृत्य केल्यास त्याचा यथायोग्य समाचार घेण्याची आमची क्षमता आहे, अशी सूचक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केली. सोमवारी मध्यरात्रीनंतर लडाख येथे गालवन खोरे परिसरात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये हिसंक झटापट झाली होती. त्यात एका कर्नलसह 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. भारताने केलेल्या जोमदार प्रतिकारात चीनचेही एका अधिकाऱयासह 43 सैनिक ठार झाले होते. त्या घटनेसंबंधी पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. सीमेवर सध्या शांतता आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या संघर्षानंतर बुधवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांना दूरध्वनी केला. दोन्ही नेत्यांनी सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यावर सहमती दर्शविली. चीनने ही घटना हेतुपुरस्सर आणि पूर्वनिर्धारित पद्धतीने घडविली आहे, असा स्पष्ट आरोप या चर्चेमध्ये जयशंकर यांनी केला. शांतता प्रस्थापित करणे हे दोन्ही देशांसाठी हिताचे आहे, यावर दोन्ही नेत्यांचा भर दिसून आला.
किमान 35 चीनी सैनिक ठार
सोमवार मध्यरात्रीच्या संघर्षात चीनचे किमान 35 सैनिक ठार झाले आहेत. यात एका वरीष्ठ सेनाधिकाऱयाचाही समावेश आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तहेर विभागानेही दिली आहे. चीनचे किमान 56 सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे, असेही सांगण्यात आले आहे. चीनने अद्याप अधिकृतरित्या त्याच्या सैनिकांच्या मृत्यूंचा आकडा घोषित केलेला नाही. मात्र, चीनी अधिकाऱयांचा एकंदर सूर आणि देहबोलीवरून त्याची मोठी हानी झाल्याचे दिसून येत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
चीनचे घातपाती कृत्य
सोमवारची घटना चीनने पूर्वनियोजित पद्धतीने घडविल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेच्या आधी दोन दिवस दोन्ही देशांमध्ये संघर्षविराम करण्यासाठी करार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी कशी होत आहे, यासंबंधी बोलणी करण्यासाठी कर्नल संतोष बाबू काही सैनिकांसह चीनच्या छावणीत गेले होते. तेथे त्यांच्यावर चीनी सैनिकांनी हल्ला केला. त्यांना लोखंडी रॉड, मोळेयुक्त काठय़ा आणि काटेरी तारांनी मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे काही जणांचे म्हणणे आहे. तथापि, चर्चेसाठी अशी प्रतिस्पर्ध्याच्या छावणीत निशःस्त्र जाण्याची पद्धत कधीच उपयोगात आणली जात नाही, असे अनेक सेनातज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही घटना पूर्वनियोजितच होती पण हा हल्ला चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या तुकडीवर उघडपणे केला असेही सांगण्यात येत आहे. हा चीनचा घातपात आहे, यावर मात्र एकमत आहे.
19 जूनला सर्वपक्षीय बैठक
लडाख संघर्षाची माहिती विरोधी पक्षांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जूनला सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. बहुतेक सर्व पक्षांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत हा संघर्ष आणि भारताने चीनला दिलेले चोख प्रत्युत्तर यांची माहिती दिली जाणार आहे.
परिस्थती तणावाचीच
लडाखच्या गालवन खोऱयातील परिस्थिती तणावाचीच आहे. अद्यापही दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून उभे आहेत. हा भाग सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्वाचा असल्याने चीनचा यावर गेली 70 वर्षे डोळा आहे. मात्र भारताने मोठय़ा हिकमतीने चीनचे सर्व मनसुबे आतापर्यंत हाणून पाडले आहेत. हा सर्व प्रदेश सध्या भारताच्याच अधिपत्यात आहे.
बलिदान व्यर्थ नाही जाणार…
देशाच्या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूरवीर सैनिकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे. या शूरांनी देशासमोर आदर्श घालून दिला आहे. अत्यंत दुर्गम प्रदेशात, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत त्यांनी हल्ल्याचा प्रतिकार ज्या निधडेपणाने केला त्याला तोड नाही, असे प्रशंसोद्गार त्यांनी या घटनेसंबंधी बोलताना काढले.
परिस्थती सांगा : काँगेसचा वार
लडाख संघर्षाच्या परिस्थितीला पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, असा प्रच्छन्न आरोप काँगेसने केला आहे. चीनने भारताच्या भूमीवर पाय ठेवलाच कसा याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधींनी केली. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार देशाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. सैनिक हुतात्मा होत असले तरी मोदींनी मिठाची गुळणी धरली आहे, असा आरोप काँगेसने केला आहे. डाव्या पक्षांनीही सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, सीमेवर हिंसाचार घडविणाऱया चीनला विरोधी पक्षांपैकी कोणीही कोणताही जाब विचारलेला नाही, हे वैशिष्टय़पूर्ण आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यासंबंधी भाजपनेही काँगेसवर जोरदार टीका केली.
चेन्नई सुपरकिंग्जचा डॉक्टर निलंबित
लडाख संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व भारत सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य टिप्पणी ट्विटरवर करणारा चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल संघाचा डॉक्टर मधू कोटापिल्ली याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला निलंबित करण्यात आले असून तक्रार सादर करण्यात आली आहे.
चीनचे नेमके नुकसान किती… पाकिस्तान प्रमाणेच चीनही त्याच्या हानीचे आकडे लपविण्याचा खोटारडेपणा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारताने त्याच्या सैनिकांच्या जीवीत हानीची माहिती पारदर्शकपणे दिली आहे. मात्र चीनने अशी माहिती दिलेली नाही. मात्र त्याची बरीच मोठी हानी झाल्याचे परिस्थितीजन्य घडामोडींवरून समजत आहे. संघर्ष झाल्यानंतर अनेक चीनी रूग्णवाहिका व हेलिकॉप्टर्स सैनिकांचे मृतदेह उचलताना दिसून आल्या. उपग्रहीय प्रतिमाचित्रांवरून ही बाब स्पष्ट होते. अमेरिकेच्या गुप्तचरांनी चीनही मोठी हानी झाल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार चीनचे किमान 43 सैनिक ठार तर 50 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय सूत्रांचाही या माहितीला दुजोरा आहे.









