नैर्त्रुत्य रेल्वे हुबळी विभागाचा अनोखा प्रयत्न : ‘गोवा टू दिल्ली’ वाहतूक : या नव्या प्रयोगाचे उद्योग-व्यापाऱयांकडून कौतुक
हुबळी : खाद्यपदार्थांची लांब पल्ल्याची वाहतूक करताना तापमान हा विषय अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे वातानुकूलित कंटेनरमधून त्यांची वाहतूक केली जाते. महागडी चॉकलेट्स रेल्वेतून वाहतूक करणे शक्य आहे. परंतु, वातानुकूलित व्यवस्था असणाऱया बोगींची संख्या कमी असल्याने अडचणी येतात. मात्र, नैर्त्रुत्य रेल्वे, हुबळी विभागाने प्रवासी वातानुकूलित बोगींचा वापर करून प्रथमच चॉकलेट्स आणि नुडल्स या पदार्थांची वास्को ते दिल्लीच्या ओखला रेल्वेस्थानकापर्यंत यशस्वीपणे वाहतूक केली आहे.
8 ऑक्टोबर रोजी वास्को द गामा रेल्वे स्थानकावरून तृतीय श्रेणीच्या 12 बोगी, तर द्वितीय श्रेणीच्या 6 अशा एकूण 18 वातानुकूलित प्रवासी बोगींमध्ये व्यवस्था करून रेल्वेने सुमारे 163 टन चॉकलेट्स व नुडल्स दिल्लीमधील ओखला स्टेशनपर्यंत वाहतूक करण्यात आली. ही वाहतूक ‘एव्हीजी लॉजिस्टिक्स’ कंपनीची होती. एकूण 2115 कि. मी. अंतर पार करून ही वातानुकूलित एक्स्प्रेस शनिवारी ओखला स्टेशनवर पोहोचली. या वाहतुकीमुळे नैर्त्रुत्य रेल्वे हुबळी विभागाला 12 लाख 83 हजार रुपयांचा लाभ झाला. हुबळी रेल्वे विभागाच्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या (बीडीयू) प्रयत्नामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
पूर्वी रस्ते मार्गाने अशा प्रकारची वाहतूक होत होती. नैर्त्रुत्य रेल्वे हुबळी विभागीय रेल्वेचे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी ग्राहकांना जलद व किफायतशीर वाहतूक सेवा देण्यासाठी हे नवे पाऊल उचलले आहे. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक करण्यासाठी रेल्वे हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. या नव्या प्रयोगाचे उद्योग आणि व्यापाऱयांकडून कौतुक होत आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने ऑक्टोबर 2020 पासून मालवाहतुकीतून दरमहा 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 1.58 कोटी रुपये इतका झाला आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत म्हणजेच सप्टेंबर अखेरपर्यंत हुबळी रेल्वे विभागाने 11.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रेल्वेने ग्राहकांना वातानुकूलित कार्गो वाहतुकीसाठी रेल्वेसेवेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.









