किरणोत्सर्गाला बळी पडल्याचा युक्रेनच्या मंत्र्याचा दावा
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या क्षेत्रात तैनात राहिलेले रशियाचे सैनिक उच्च स्तराच्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात होते, याचमुळे त्यांच्याकडे आता जगण्यासाठी एक वर्षाचा कालावधी असल्याचा दावा युक्रेनच्या एका मंत्र्याने केला आहे. चेर्नोबिल या जगातील सर्वात भीषण आण्विक दुर्घटनेचे स्थळ युद्धाच्या प्रारंभीच रशियाच्या सैनिकांच्या ताब्यात गेले होते. 31 मार्च रोजी सैनिकांकडून परिसर पूर्ण रिकामा करविण्यात आल्यावर 5 एप्रिल रोजी युक्रेनच्या नॅशनल गार्डने प्रकल्प पुन्हा स्वतःच्या नियंत्रणात आणला होता.
केवळ सैनिक किरणोत्सर्गाच्या संपर्कात नव्हते, तर त्यांची सैन्य उपकरणे देखील किरणोत्सर्गी झाली आहेत. सैनिकांनी स्वतःच्या उघडय़ा हातांनी दूषित माती खोदली, किरणोत्सर्गी वाळू पिशव्यांमध्ये भरली आणि धूळीत श्वास घेतला आहे. अशाप्रकारच्या जोखिमीच्या एका महिन्यानंतर त्यांच्याकडे जगण्यासाठी कमाल एक वर्ष आहे. ते हळूहळू स्वतःच्या आजारांनी मरत आहेत हे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याचे या मंत्र्याने नमूद केले आहे.
रशियाच्या सैन्याने प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाचीही लूट केली आहे. क्रॉकरीपासून स्पेयर पार्ट्स आणि उपकरणेही त्यांनी लुटली आहेत. केवळ कब्जा करणारे सैनिक आणि त्यांची शस्त्रास्त्रs दूषित झालेली नाहीत, तर सर्व सैन्य उपकरणे दूषित आहेत. प्रत्येक रशियन सैनिक चेर्नोबिलचा एक तुकडा घरी नेणार आहे, भले तो जिवंत असो किंवा मृत असे मंत्री गालुशचेंको यांनी म्हटले आहे.
धातू विशेषकरून किरणोत्सर्गासाठी अतिसंवेदनशील असतात. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील मालमत्ता किंवा यंत्रांच्या संपर्कात येणाऱया कुठल्याही व्यक्तीसाठी किरणोत्सर्गी प्रदूषण एक मोठा धोका आहे असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे. युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्रकल्पात 26 एप्रिल 1986 रोजी मानवी इतिहासातील सर्वात भीषण आण्विक दुर्घटना घडली होती.









