प्रतिनिधी /सातारा :
जिल्हय़ात चेन स्नेचिंगसह दागिन्यांना पॉलिश करुन देण्याचा बहाणा करत लुबाडणारी तसेच घरफोडी, दुचाकी, मोबाईल चोऱया करणाऱया चारजणांच्या टोळीस जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या टोळीकडून सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण चोरीचा 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.
जबरी चोरी करणारे जानवर शौकत भोसले (वय 19 रा. नागठाणे, ता. सातारा) व आबदेश यंत्र्या भोसले (वय 20 रा. फडतरवाडी, ता. सातारा) तर मोटार सायकल चोरीतील प्रल्हाद रमेश पवार (वय 18 रा. केसकरपेठ, सातारा) व अल्पवयीन बालक अशा चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर तसेच जिल्हय़ात एकटय़ा महिलांना गाठून त्यांच्या गळय़ातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेण्याच्या घटना घडल्या होत्या तर दुचाकी चोऱयाही वाढल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना केल्या होत्या.
सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना हे गुन्हे उघड करून संशयितांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दि. 26 ऑगस्ट रोजी प्रसन्न जऱहाड व त्यांचे पथक सातारा शहर व परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सातारा शहर परिसरात चेनस्नॅचिंग व दुचाकी चोऱया केलेले संशयित पुन्हा चोरी करण्यासाठी येणार आहेत.
या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून या संशयितांना पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी चेनस्नॅचिंग व दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केल्याने त्यांना दोन वेगवेगळ्या गुह्यात अटक करून त्यांच्याकडे योग्य पद्धतीने चौकशी केली असता या चोरटय़ांनी दोन टोळ्या तयार करुन एक टोळी चेनस्नॅचिंग व दुसरी टोळी दुचाकी चोरी करीत असल्याचे सांगितले. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या गुह्यात चेनस्नॅचिंग करून चोरलेले मौल्यवान सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल जप्त केले आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर बनकर, प्रवीण शिंदे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, विजय कांबळे, मोहन नाचण, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विशाल पवार यांनी सहभाग घेतला.
चौकट
विविध ठिकाणी चोऱयांची कबुली
एक वर्षापूर्वी वाई तालुक्यातील खेडेगावांमध्ये महिलांना सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्यातील काही सोने केमिकलचा वापर करून गाळून काढून घेऊन महिलांची फसवणूक होत असल्याबाबत या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने अटक केलेल्या टोळीकडे कसून चौकशी केली असता सोने फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. टोळीने तारळे ते सडावाघापूर जाणाऱया मार्गावर समर्थगाव व उंब्रज परिसरांमधून ऊसतोड व वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांच्या घरामध्ये चोऱया करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.









