12 हंगामात 4 जेतेपदे, 5 वेळा उपजेतेपदानंतर करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नेतृत्वाचा राजीनामा, मात्र, आयपीएलमध्ये यापुढेही खेळत राहणार
वृत्तसंस्था /मुंबई
12 हंगामात 4 वेळा विजेतेपद आणि पाचवेळा उपविजेतेपद मिळवून देणाऱया करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्स नेतृत्वाची सूत्रे आपला विश्वासू सहकारी रविंद्र जडेजाकडे सोपवली. चेन्नई सुपरकिंग्स व्यवस्थापनाने एका संक्षिप्त पत्रकाच्या माध्यमातून या बदलाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, नेतृत्वाचा राजीनामा दिला असला तरी 40 वर्षीय धोनी या हंगामात व त्यापुढेही खेळत राहणार असल्याचे चेन्नईने नमूद केले.
‘महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला असून जडेजाकडे ही धुरा सोपवली गेली आहे. जडेजा 2012 पासून चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अविभाज्य घटक राहत आला असून या संघाचा तो तिसरा कर्णधार असणार आहे’, असे या प्रँचायझीने गुरुवारी नमूद केले.
40 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून मागील हंगामात त्याने चेन्नईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. भारताला दोनवेळा आयसीसी विश्वचषक जिंकून देणारा हा दिग्गज स्टार सातत्याने आश्चर्याचे धक्के देत आला असून यंदाच्या आयपीएलला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना त्याने चेन्नईच्या नेतृत्वाचा राजीनामा देत याचा आणखी एकदा दाखला दिला.
धोनीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरु असताना त्याच्या मध्यातच कसोटी नेतृत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराट कोहली सर्व क्रिकेट प्रकारात नेतृत्वासाठी सज्ज असल्याचे ताडत 2017 मध्ये त्याने विराटचा मार्ग स्वतःहून खुला करुन दिला होता.
आपण यापुढे अधिक काळ सक्रिय राहू शकणार नाही, याची जाणीव असल्याने आणि 33 वर्षीय जडेजा कारकिर्दीच्या सर्वोच्च बहरात असताना धोनीने येथेही स्वतः पुढाकार घेत नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि जडेजाकडे नेतृत्वाची सूत्रे सोपवली. यंदा मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने धोनी, मोईन अली व ऋतुराज गायकवाड यांच्यापूर्वी रविंद्र जडेजाला सर्वोच्च प्राधान्याने रिटेन केले होते.
मध्यंतरी चेन्नई सुपरकिंग्सचा संघ दोन वर्षे निलंबनामुळे आयपीएलमधून बाहेर होता. मात्र, धोनीच्या करिष्माई नेतृत्वाच्या बळावर 2018 मध्ये जोरदार पुनरागमन करताना चेन्नईने तिसऱयांदा आयपीएल जेतेपद पटकावले होते. एरवी, सर्वाधिक पाच विजेतेपदामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी प्रँचायझी म्हणून ओळखला जातो. मात्र, प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या निकषावर मुंबईला देखील चेन्नईइतके सातत्य कायम राखता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
2020 मध्ये वयस्कर खेळाडूंचा अधिक भरणा असताना चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आले नाही, त्यावेळी त्यांना डॅड्स आर्मी असे हिणवले गेले. मात्र, धोनी आणि कंपनीने मागील हंगामात चौथ्यांदा जेतेपद संपादन करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. धोनी पूर्वीसारखा अव्वल दर्जाचा फिनिशर राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती असली तरी त्याची निव्वळ उपस्थिती देखील सहकाऱयांना निश्चितपणाने प्रेरणा देणारी असते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 204 पैकी 121 सामने जिंकले, हे त्याचेच प्रतिबिंब मानले जाते.
मोईन अलीचा व्हिसा मंजूर, दुसऱया सामन्यासाठी उपलब्ध

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीला भारताचा व्हिसा मंजूर झाला असून आयपीएल स्पर्धेत चेन्नईच्या दुसऱया सामन्यापासून तो उपलब्ध असणार आहे. इंग्लंडचा हा दिग्गज खेळाडू गुरुवारी भारतात दाखल होणे अपेक्षित होते.
चेन्नईचा पहिला सामना उद्या (शनिवार दि. 26) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. मात्र, मोईन अलीला 3 दिवसांचे हार्ड क्वारन्टाईन पूर्ण करावे लागणार असल्याने सलामी सामन्यात तो खेळू शकणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. चेन्नईचा संघ यंदा दि. 31 मार्च रोजी लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध आपली दुसरी लढत खेळणार आहे.
मोईन अलीने गतवर्षी चेन्नईतर्फे खेळलेल्या 15 सामन्यात 357 धावांचे योगदान दिले. शिवाय, ऑफस्पिन गोलंदाजी करत 6 बळी घेतले. यंदाही चेन्नई प्रँचायझीला या अष्टपैलू खेळाडूकडून भरीव अपेक्षा असणार आहेत.
राजस्थानला आयपीएल जिंकून देण्याची कोल्टर-नाईलची महत्त्वाकांक्षा

अष्टपैलू नॅथन कोल्टर-नाईल हा डॅरेल मिशेलसह राजस्थान रॉयल संघात दाखल झाला असून यंदाची आयपीएल आवृत्ती जिंकून देण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचे त्याने नमूद केले आहे. मूळ ऑस्ट्रेलियाचा नॅथन कोल्टर-नाईलने विविध संघांकडून आयपीएल खेळले आहे तर न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिशेल आपल्या पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामात खेळत असणार आहे.
नॅथन कोल्टर नाईलला यंदा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लंकेचा माजी जलद गोलंदाज लसिथ मलिंगाचे मार्गदर्शन लाभणार असून यासाठीही आपण उत्सुक असल्याचे त्याने म्हटले. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 22 सामन्यात कोल्टर-नाईलने 48 बळी घेतले आहेत.
मयांक अगरवाल सर्वस्व पणाला लावून लढणारा कर्णधार : राहुल चहर

आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, लेगस्पिनर राहुल चहरने पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अगरवालच्या नेतृत्व गुणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यापूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारा राहुल चहर यंदा पंजाब किंग्स संघाकडून खेळणार आहे. पंजाबने मेगा ऑक्शनमध्ये चहरला 5.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले.
‘मयांक अगरवाल भारत व भारत अ संघातर्फे सातत्यपूर्ण योगदान देण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. मागील 3-4 वर्षांपासून तो पंजाबचा घटक राहिला असून त्याच्यासमवेत सराव करत असताना त्याची सर्वस्व पणाला लावून लढण्याची प्रवृत्ती मला प्रकर्षाने दिसून आली. तो अव्वल दर्जाचा कर्णधार आहे आणि अतिशय एकाग्र असतो. नव्या संघाकडून, नव्या जर्सीत खेळण्यासाठी मी अर्थातच उत्सुक आहे’, असे राहुल चहर याप्रसंगी म्हणाला. पंजाब किंग्स संघाची यंदाची आयपीएल मोहीम रविवार दि. 27 रोजी आरसीबीविरुद्ध लढतीने सुरु होणार आहे.

धोनीने जर असा निर्णय घेतला असेल तर तो संघाच्या हिताचाच असेल, याची मला खात्री आहे. त्यामुळे, याची फारशी चिंता नाही. धोनीचे मार्गदर्शन संघाला नेहमी लाभत राहील, याची आम्हाला खात्री आहे.
-चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन

विराट कोहलीने सर्व क्रिकेट प्रकारातून नेतृत्वावरुन पायउतार होणे पसंत केले, त्या निर्णयाचा त्याला आयपीएलमध्ये सर्वप्रथम लाभ जाणवेल. जागतिक स्तरावरील अन्य कोणत्याही कर्णधारावर भारतीय संघाच्या कर्णधाराइतके दडपण नसते. ही जबाबदारी सोडली असल्याने विराट आता आरसीबीतर्फे आणखी मुक्तपणे खेळताना दिसून येऊ शकेल.
-भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री









