पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : अंदमान-निकोबारमधील फोन-इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अंदमान निकोबार बेटांना नवक्रांतीची मोठी भेट दिली. केंद्र सरकारने येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली असून याद्वारे संपूर्ण बेटावर फोन-इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा प्रकल्प बीएसएनएलमार्फत पूर्ण झाला असून केबल समुद्राखालून टाकण्यात आली आहे. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदमान निकोबारला प्रतिसेकंद 400 जीबीपर्यंत वेग मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून अंदमान-निकोबार बेटावरील इंटरनेट यंत्रणा सुधारणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअरपर्यंत समुद्राखालून 2 हजार 313 किलोमीटर लांबीची केबल टाकण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2018 मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. केवळ 24 महिन्यांच्या आत समुद्रात केबल टाकण्यात आली असून कोणत्याही विदेशी कंपनीच्या सहकार्याविना भारतीय कंपनीनेच हे काम पूर्ण केले आहे.
या प्रकल्पासाठी एकूण 1,224 कोटींचा खर्च आला आहे. ही केबल स्वराज बेट, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोरोता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रंगत येथेपर्यंत पोहोचणार आहे. या केबलच्या माध्यमातून पोर्ट ब्लेअरला प्रतिसेकंद 400 जीबी तर इतर बेटांवर 200 जीबी प्रतिसेकंदाची गती मिळू शकणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बीएसएनएल कंपनी संपूर्ण नेटवर्कचे काम पाहणार आहे. परंतु नंतर खासगी कंपन्यांना संधी देण्याचा विचार आहे.
पर्यटकांसाठी लाभदायी
या प्रकल्पाच्या सहाय्याने टेलि-एज्युकेशन, टेलि-हेल्थ, ई-गव्हर्नन्स, पर्यटन या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्मयता आहे. 15 ऑगस्ट साजरा करण्यापूर्वी अंदमानच्या लोकांना ही मोठी भेट आहे. आता येथे कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवणार नसल्याने येथे येणाऱया लोकांच्या वास्तव्याचा काळ वाढेल. तसेच पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा पंतप्रधानांनी केला आहे.
आता जलवाहिनी पोहोचवणार!
या इंटरनेट केबलचे काम पूर्ण झाले असल्याने आता लवकरच पोर्ट ब्लेअरला जवळच्या इतर बेटांशी जोडण्यासाठी जलवाहिनी तयार केली जाईल. नद्यांना जोडून देशात यावर काम सुरू आहे, असेही यावेळी पंतप्रधानांनी जाहीर केले आहे पंतप्रधानांच्या या सुतोवाचामुळे अंदमान-निकोबारमधील आणखी एक समस्याही मिटणार आहे.









